तासगाव, दि.7 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्याने तासगाव कवठेमहांकाळमधील शहर व ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी सहा कोटी दहा लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून संजय काका पाटील मटदार संघाच्या विकास कामासाठी अविरत प्रयत्न करीत असल्याची माहिती युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी दिली. प्रभाकर पाटील म्हणाले, तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील तासगाव शहर कवठेमहांकाळ शहर तसेच तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात लोकांच्या अडीअडचणी समजावून घेत असताना खासदार संजयकाका व माझ्याकडे तेथील जनतेचे अनेक प्रश्न समोर आले. आपल्या राज्य सरकारकडून निधीची उपलब्धता करण्यासाठी शहरातील विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथरावजी शिंदे व तासगाव व कवठेमहांकाळ ग्रामीण भागासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे पाठपुरावा करून तासगाव शहरासाठी नगर विकास विभागातून 2 कोटी रुपये, कवठेमहांकाळ शहरातील विकास कामांसाठी नगर विकास विभागाकडून 2 कोटी, तसेच तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी कुशल विकास कामे अंतर्गत (मनरेगा) अनुक्रमे एक कोटी व एक कोटी दहा लाख रुपये विविध गावांमध्ये विकास कामांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. याबाबत विविध गावातील जनतेने खासदार संजय काका पाटील यांचे आभार मानले आहेत, यापुढेही विकास कामांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागासाठी आणखी अधिकचा निधी मंजूर करण्यासाठी मी व खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत लवकरच त्यास यश येईल व विकास कामासाठी अधिकचा निधी उपलब्ध होईल असा आशावाद प्रभाकरबाबा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

