तासगाव बाजार समिती ताकदीने लढवणार : खासदार संजय पाटील

तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. शनिवारी कार्यकर्त्यांची हो इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित केली असून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असल्याची माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली. सावळज (ता. तासगाव) येथे पत्रकारांशी झालेल्या चर्चेत त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले, सांगली बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने गेले काही दिवस व्यस्त होतो. म्हणून तासगाव बाजार समितीत निवडणुकीसाठी इच्छुकांना अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या सर्व इच्छुकांशी व पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून तासगाव बाजार समिती निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाजार समिती हे एक माध्यम आहे. तासगाव तालुक्यातील बाजार समिती निवडणुकीत लवकरच योग्य व उघड भूमिका घेऊन मैदानात उतरणार असल्याची संकेत खासदार पाटील यांनी या बैठकीत दिले. दरम्यान तालुक्यात बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या आमदार खासदारांच्या सेटलमेंट चर्चेवर बोलताना खासदारांनी असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्याची संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी चालली पाहिजे. या उद्देशानेच या निवडणुकीला आम्ही सामोरे आहे. तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली जाईल. तिसऱ्या आघाडी बाबत बोलताना खासदार म्हणाले, तालुक्यातील शेतकरी हित जपणाऱ्या सर्वच नेतेमंडळींशी सविस्तर चर्चा करून एकत्रितपणे पॅनल लावण्यासाठी पुढाकार घेणार आहे. असे स्पष्ट संकेत खासदार संजय पाटील यांनी दिले.