तासगाव, दि. २९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) नाशिकच्या द्राक्ष व्यापाऱ्याला तासगाव येथील गणेश कॉलनीत तलवारीचा धाक दाखवून वाटमारी करणाऱ्या टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २४ तासाच्या आत जेरबंद केले. मतकुणकी, ता. तासगाव येथील तीन संशयित युवकांना अटक केली असून त्याच्या कडून एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. नितीन खंडू यलमार (वय २२), विकास मारुती पाटील (वय ३२) व अजित राजेंद्र पाटील (वय २२) सर्वजण रा. मतकुणकी, ता. तासगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी, महेश शीतलदास केवलाणी (वय – ४६) रा. पिंपळगाव ता. निफाड जि. नाशिक हे गेल्या अनेक वर्षापासून तासगाव तालुक्यात द्राक्ष व्यापार करीत आहेत. ते सध्या तासगाव शहरातील दत्तमाळ येथील गणेश कॉलनीत राहत आहेत. महेश केवलाणी, त्यांचा दिवानजी राजेंद्र माळी, चालक आकाश चव्हाण हे सर्वजण मिळून मंगळवारी दुपारी सांगली येथून स्कॉर्पियो क्र. एम एच १५ जीएफ ०२१५ मधून पैसे घेवून तासगाव कडे येत होते. संशयित आरोपीच्या टोळीने त्यांच्या गाडीचा पाठलाग करीत त्यांना गणेश कॉलनीत दुचाकी आडवी मारून आडवले. यावेळी चालक आकाश चव्हाण याच्या बाजूच्या काचेवर थाप मारून काच खाली घ्यायला लावली. त्यास तलवारीचा धाक दाखवून स्कॉर्पियोची चावी काढून घेतली. याच वेळी हल्लेखोरांनी पाठी मागे बसलेल्या महेश केवलाणी व दिवानजी राजेंद्र माळी यांना बाहेर ओढून जबर मारहाण केली. त्यांच्या कडील रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली आणि हल्लेखोर तेथून पळून गेले. या झटापटीत व्यापारी केलवाणी यांच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी पोलीस फौजफाटयासह धाव घेतली. तत्काळ तपास यंत्रणा राबवली ठिकठिकाणी नाकाबंदी केली. घटनेची तीव्रता लक्षात घेता जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.बसवराज तेली, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे, एल.सी.बी चे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या सह पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाची चक्रे फिरवली. हल्लेखोर गेलेल्या दिशेला पथके रवाना केली. एलसीबीचे सागर टिंगरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत तासगावातील जबरी चोरीबाबत माहिती मिळाली. त्यांनी आपल्या तपासाची चक्रे गतीमान केली. यावेळी त्यांना रोकड घेऊन पळालेली टोळी मणेराजुरी येथील शिकोबा डोंगराच्या पायथ्याशी असल्याची माहिती मिळाली. टिंगरे यांनी तात्काळ ही माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तात्काळ छापा टाकून पळून जाण्याच्या तयारी असलेल्या टोळीच्या पाठलाग करून मुसक्या आवळल्या त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, तलवार आणि एक कोटी नऊ लाख तीस हजार अशी रोकड असलेली बॅग हस्तगत केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कबुली दिली. त्यामुळे अवघ्या काही तासांत या जबरी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. तासगावातील जबरी चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही चोरीची असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. संशयित आरोपी नितीन यलमार याने ही दुचाकी किल्लेमच्छिंद्रगड येथून चोरल्याची कबुली दिली आहे. या चोरीबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संपूर्ण तपास जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.बसवराज तेली, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे, एल.सी.बी चे निरीक्षक सतीश शिंदे, तासगाव पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, प्रशांत निशानदार, सागर टिंगरे, संदीप गुरव, सागर लवटे, संदीप पाटील, संतोष गळवे, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे, चेतन महाजन, प्रशांत माळी, अजय बेंद्रे, गौतम कांबळे, सचिन कनप, दिपक गठ्ठे, गजानन घस्ते, मच्छिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, सुधीर गोरे याच्या पथकाने केला. पोलिसांच्या या तत्परतेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
