तासगाव, दि.16 मार्च 2023(प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव च्या श्री सिद्धिविनायक गणपतीचे दाक्षिणात्य पद्धतीचे पुरातन मंदिर व गोपूर हे जगप्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थी ला होणारा दीड दिवसाच्या गणपतीचा पारंपरिक रथोत्सव हा सुद्धा तितकाच लोकप्रिय आहे. अगदी त्याच प्रमाणे तासगाव शहरातील शिंपी गल्ली मधील श्री.विठ्ठल मंदीराचाची ऐतिहासिक रथोत्सवाची परंपरा चालू आहे. फाल्गुन वैद्य प्रतिपदा ते कालाष्टमी या कालावधीत होणारा हा रथोत्सव सुद्धा लोकप्रिय आहे. फाल्गुन वैद्य प्रतिपदा ते कालाष्टमी या कालावधीत मंदिरात अखंड वीणा सप्ताह असतो. अखंडवीणा सप्ताहामध्ये तुकाराम बीजेला आणि नाथषष्ठीला पुष्पवृष्टी होते. तर कालाष्टमीला रथोत्सव संपन्न होतो. नुकताच हा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने जाणून घेऊया या उत्सावाबद्दल माहिती, हे मंदिर फार जुने आणि पुरातन आहे. त्या मंदिराचे पुजारी हे एक ब्राम्हण गृहस्थ होते. त्यांनी काही कारणास्तव या मंदिराची मालकी आणि पौराहित्य सन १८९० ला तत्कालीन नामदेव शिंपी समाजाला सुपूर्द केले. त्यावेळी सुप्रसिद्ध शिक्षक कै.गजानन धोंडीराम तथा ग.धों.मुळे यांचे पणजोबा कृष्णाजी अप्पा मुळे हे या मंदीराचे प्रमुख विश्वस्त होते. पुढे शिंपी समाजाने विठोबादेव विश्वस्त मंडळ स्थापन केले. त्यामध्ये दर पाच वर्षांनी बाकीचे सदस्य बदलत असले तरी मुळे यांच्या घराण्यातील एक सदस्य हा पदसिद्ध असे, ती परंपरा आजही सुरु आहे. या मंदिराचे जे मूळ स्वरूप आहे ते तसेच आहे मात्र त्याचा जीर्णोद्धार अनेकवेळा झाला. गाभारा जुना दगडी हेमाद्रीपंती किंवा हेमाड पंती असून त्यावरील शिखर आणि कळससुद्धा जुनाच आहे. गाभाऱ्यात श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या अतिशय देखण्या गंडकी दगडात घडविलेल्या मूर्ती आहेत. या मूर्ती पूर्वाभिमुख असून विठोबाच्या उजव्या बाजूस मूळ गाभाऱ्या लगत ब्रम्हीभूत ब्रम्हचारी बाबाराम महाराज यांची समाधी आहे. हे महाराज कडक आणि कर्मठ ब्रम्ह चर्याचे पालन करायचे, ते स्त्रियांची सावलीसुद्धा आपल्या शरीरावर पडून देत नसत. त्यामुळे त्यांच्या समाधीचे जवळून किंवा स्पर्श करून दर्शन घेण्यास स्त्रियांना आजही परवानगी नाही. डाव्या बाजूस संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. पुढे दोन मजली लाकडी सभामंडप आहे. या मंदिरात नित्य देवपूजा आणि हरिपाठ चालतो. रोज सायंकाळी मंदिरात ग्रंथ वाचन आणि त्याचे निरुपण चालते, त्यासाठी व्यासपीठाची स्वतंत्र व्यवस्था आहे. या व्यासपीठावरून रोजगार हमी योजनेचे जनक आणि विधान परिषदेचे माजी सभापती कै.विठ्ठल सखाराम तथा वि.स.पागे यांनी काही वर्षे निरु पण केले. नंतर नारायण होमकर, अण्णाप्पा वजरीणकर, महादेव टिळे, शिंदे गुरुजी, बाळकृष्ण माळवदे अशा अनेकांनी हे व्यासपीठ चालविले. प्रत्येक एकादशीला टाळ मृदंगाच्या साथीने भजन कीर्तन चालते. आषाढ महिन्यात संकष्टी चतुर्दशी ते त्रयोदशी या दहा दिवसाच्या काळात संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा असतो. फाल्गुन वद्य प्रतिपदा ते कालाष्टमी या कालावधीत मंदिरात अखंड वीणा सप्ताह असतो. अखंडवीणा सप्ताहामध्ये तुकाराम बीजेला आणि नाथषष्ठीला पुष्पवृष्टी होते. तसेच रोज रात्री भजन असते, कालाष्टमीला रथोत्सवाने आणि त्यानंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होते. रथोत्सवाची सुरुवात नक्की कधी झाली हे माहीत नाही. गणपतीच्या रथोत्सवानंतर या उत्सवाची सुरुवात झाली असावी असा अंदाज आहे. पूर्वी हा रथ लाकडी होता, सध्या तो लोखंडी आहे. रथावरील ध्वज लावायचा मान टिळे घराण्याकडे, रथाच्या सजावटीचा मान आंबेकर घराण्याकडे, अब्दागिरीचा मान अवसरे घराण्याकडे, रथावर पताका लावण्याचा मान पोरे घराण्या कडे आणि रथावर भंडारा उधळण्याचा मान वेल्हाळ घराण्याकडे आहे. अशाप्रकारे सगळी कामं वेगवेगळ्या लोकांकडे वाटून दिल्यामुळे रथोत्सव अविरतपणे चालू आहे. पूर्वीची उत्सव मूर्ती ही पंचधातूची होती ती महिंद्रकर घराण्याने दान केली होती. पुढे काही कारणांनी त्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले नंतर सध्याची मूर्ती विद्यानिकेतनचे संस्थापक संचालक आणि कला शिक्षक कै.कृष्णनाथ कोळेकर यांनी दान केलेली आहे. ही मुर्ती पितळी असून हरिनामाच्या गज रात आणि टाळ मृदंगाच्या साथीने, मोठ्या उत्साहात गाभाऱ्यातून रथात आणून ठेवली जाते. रथावर गुलाल बुक्क्याची उधळण होते आणि हरि नामाच्या गजरात रथ मार्गक्रमण करतो. मंदिराच्या दक्षिणेस असलेल्या सराफपेठेतून पूर्वी ही रथयात्रा वेशी वरच्या मारुतीरायाच्या भेटीला जात असे, सध्या मात्र ती चौकापर्यंतच जाते. शहरातील सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने आणि अपार आनंदाने या उत्सवात सहभागी होतात. रथोत्सवात समाजातील बारा बलुतेदारांचे योगदान आणि उस्फुर्त सहभाग असतो. अशा या सामाजिक आणि अध्यात्मिक अशा उत्सवांमुळे आणि चांगल्या उपक्रमांमुळेच भागवत धर्माची पताका अखंड फडकत आहे.
संतकृपा झाली!इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया!उभारिले देवालया
नामा तयाचा कंकर! तेणे केला विस्तार
जनार्दन एकनाथ ! खांब दिला भागवत
तुका झालासे कळस!भजन करा सावकाश
लेखन –
मिलींद विश्वनाथ सुतार
तासगांव जि.सांगली
