द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजना करावी – रोहित पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सांगली, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) द्राक्ष उत्पादक बागायतदार-शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रावादी चे युवा नेते रोहित पाटील यांनी केली. या संदर्भात रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांच्या शिष्ठमंडळासह सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची भेट घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, अर्जुन पाटील, संजय पाटील, सागर पाटील, विश्वास पाटील, दत्ता हावळे उपस्थित होते. चालू हंगामात अनेक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी गंडा घातला आहे. याची सर्वात जास्त झळ तासगाव तालुक्यातील बागायतदाराना बसली आहे. फसवणूकीचा आकडा लाखो -कोटीच्या घरात गेला आहे. सातत्याने दर वर्षी हे प्रकार सर्रास घडत आहेत. शेतकरी आणी व्यापारी यांच्यात होणाऱ्या व्यवहारावर कोणत्याच शासकीय यंत्रणेचा अंकुश नाही, वर्षभर काबाडकष्ट करून पिकवलेल्या द्राक्षांचे पैसे बुडवून व्यापारी पळून जात आहेत. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यासर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी रोहित पाटील यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. द्राक्ष खरेदीसाठी नवीन व सुरक्षित प्रणाली प्रशासनाच्या वतीने सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या चर्चेत जिल्हाधिकारी दयानिधी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय पोर्टल सुरू करण्यात येणार असून संबंधित पोर्टलवर अधिकृत नोंदणी असलेल्या व्यापाऱ्यांनाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपली द्राक्षे विकाता येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली. दरम्यान या पोर्टल बाबत शेतकऱ्यांना अधिक माहिती मिळावी यासाठी सांगली पोलीस अधीक्षक यांच्यासोबत लवकरच एका व्यापक ऑनलाइन बैठकीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.