नाभिक समाजाने आर्थिक , सामाजिक व शैक्षणिक विकास साधावा : विशाखा झेंडे

तासगावात वीर शिवा काशीद पुण्यतिथी उत्साहात साजरी

तासगाव, गुरुवार दि. 13 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नाभिक समाजातील मुलांनी शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे. स्वतःचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन तासगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा बजरंग झेंडे यांनी केले. तासगाव येथे संत सेना सेवा संघ व नाभिक समाजाच्यावतीने विररत्न शिवा काशीद यांचा ३६३ वा स्मृतिदिन संत सेना मंदिरात साजरा झाला. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या विद्यार्थ्यांच्यात सकारात्मकता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कृतीही असणे गरजेचे आहे. जिद्द, चिकाटी असेल तर यश नक्की मिळते. समाजानेही त्यांना पाठबळ द्यावे. प्रारंभी विशाखा झेंडे यांच्या हस्ते विररत्न शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी वैशाली सुरेश माने होत्या. तर बाळासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तासगाव नगरपरिषदेचे माजी शिक्षण सभापती किशोर गायकवाड म्हणाले, किल्ले पन्हाळा गडाला सिद्दी जोहरने घातलेल्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी प्रति शिवाजी बनून स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे नाभिक समाजाचे रत्न नरवीर शिवा काशीद यांनी स्वामिनिष्ठा काय असते हे दाखवून दिले आहे. यावेळी पत्रकार दत्तात्रय सपकाळ , उमेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत उमेश गायकवाड यांनी केले. तर आभार सुमित माने यांनी मानले. कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.