नाशिकच्या द्राक्ष व्यापाऱ्यांची तासगावात वाटमारी, एक कोटी दहा लाखाची रोकड लंपास

तासगाव, दि.29 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नाशिकच्या द्राक्ष व्यापाऱ्यास तासगाव येथे मारहाण करून सुमारे एक कोटी दहा लाख रुपयांना लुटले. ही घटना काल मंगळवारी सायंकाळी तासगाव येथील दत्तमाळ गणेश कॉलनीत घडली. घटनास्थळी तासगाव पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन तपास यंत्रणा सुरु केली. याबाबत अधिक माहिती, अशी की, महेश केलवाणी (मूळ राहणार – नाशिक) हे गेल्या अनेक वर्षा पासून द्राक्ष व्यापारासाठी तासगाव तालुक्यात येत आहेत. ते सध्या दत्त माळ येथील अजंठा पेट्रोल पंपाच्या पाठीमागील गणेश कॉलनीत भाड्याने रूम घेऊन रहात आहेत. काल मंगळवारी सायंकाळी कलवणी आपल्या सहकाऱ्यासह स्कॉर्पिओ गाडीतून जात होते. अगदी याच वेळी गणेश कॉलनीतील मुख्य रस्त्यावर अज्ञात सहा ते सात जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली. हल्लेखोरांनी व्यापारी केलवाणी, स्कॉर्पिओ चालक व केलवाणी यांच्या साथीदाराना जबर मारहाण केली. यात केलवाणी यांच्या डोक्याला मार लागून रक्त आले. यावेळी हल्लेखोरांनी केलवाणी यांची स्कॉर्पिओ मधील एका कोटी दहा लाख रुपयांची बॅग हिसकावून घेऊन तेथून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक भानुदास निभोरे पोलीस ताफ्यांसह दाखल झाले. त्यानी पोलिसांची पथके चोरट्याच्या शोधात रवाना केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ठिकठिकाणी नाका बंदी केली. जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट घेऊन पुढील सूचना दिल्या. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काल सायंकाळी शहरातील काही भागातील लाईट गेली होती अगदी याच कालावधीत ही घटना घडल्याने चोरट्यानी अंधाराचा फायदा उठवला आहे तर तपास कामात अडथळा निर्माण झाला आहे. चोरट्यानी केलवाणी यांच्या वर पाळत ठेऊन प्लॅनिंग करून ही वाटमारी केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या घटनेत अजून किती जणांचा सहभाग आहे, चोरटे कोणत्या भागात पळून गेले याचा तपास पोलिस घेत आहेत. या बाबत रात्री उशिरा पर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम चालू होते.