डॉ. प्रतिभा पैलवान यांच्या पायी दिंडीचे आत्मकथन
पंढरपूर, दि.6 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)इचलकरंजी येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या डॉ प्रतिभा पैलवान यांच्या “तू माझा सांगाती” या ललित संग्रहाचे प्रकाशन श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी सोहळ्यामध्ये आलेल्या अनुभवाचे कथन या संग्रहामध्ये करण्यात आलेले आहे. ‘हा अविस्मरणीय प्रकाशन सोहळा साक्षात परब्रम्ह परम चैतन्य श्री पांडुरंगाच्या चरणाजवळ झाला हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे, काळजात शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवाव्यात अश्या आठवणीने आज आयुष्य समृद्ध झालं.’ असे मत डॉ पैलवान यांनी यावेळी व्यक्त केले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड चोवीस तास विणा घेऊन उभे असणारे श्री बडे बंधु यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. मंदिरात संग्रहाचे प्रकाशन होणे हा महाराष्ट्रातील, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील क्वचित घडून येणारा प्रसंग अनुभवास मिळाला, त्याबद्दल डॉ.पैलवान यांना अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या, श्री विठ्ठलाच्या चरणांशी असा सोहळा संपन्न होणे ही पूर्व जन्माची पुण्याई आहे, डॉ.पैलवान करत असलेल्या सामाजिक साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यासाठी श्री विठ्ठलाचे आशिर्वाद आहेत,असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी युवा नेते माननीय प्रणव परिचारक, ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह भ प मदन महाराज हरिदासी, शकुंतला नडगिरे, पंढरपूर येथील अयोध्या ज्वेलर्सचे शहाजी मोहिते, वेलनेस कोच महानंदा कदम, पुणे जिल्हा सरपंच महासंघाचे अध्यक्ष विकास कडू पाटील, पुणे जिल्हा सरपंच संघाचे उपाध्यक्ष सागर चोरघे, ज्येष्ठ समाजसेविका सुनंदा पाटील, तासगाव येथील नोबल ज्वेलर्स चे किरण पाटील, डिजिटल मीडिया सांगलीचे तानाजीराव जाधव, विद्या जाधव, विठ्ठल रुक्मिणी मंदिर नित्योपचार प्रमुख अरुण सरगर उपस्थित होते.

