पुस्तकांशी मैत्री करा – कवयित्री प्रा. प्रतिभा पैलवान

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात वाङ्मय मंडळ उद्घाटन

तासगाव, गुरुवार दि. 31 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) साहित्य जगण्याला प्रेरणा देते तर पुस्तक आपल्याला प्रगल्भ करते. वाचनाची आवड आपण लावली पाहिजे साहित्य आपल्याला शेवटपर्यंत साथ देते म्हणून पुस्तकांशी मैत्री करा असे उद्गार प्रसिद्ध कवयित्री प्रतिभा पैलवान यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे वाङ्मय मंडळ उद्घाटन व ‘संस्कार’अंक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढले. मराठी, हिंदी, इंग्रजी विभागाच्या वतीने वाङ्मय मंडळाची स्थापना केली. कवयित्री पुढे म्हणाल्या या महाविद्यालयाने मला घडविले माझी पहिली कविता याच महाविद्यालयाने प्रकाशित केली. माझी कविता जगण्याची श्वास झाली असे सांगून मनोरंजनातून त्यांनी समाजप्रबोधन केले. आपल्या वेगवेगळ्या कवितातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मराठी विभागाच्या वतीने प्रसिद्ध रानकवी ना.धो.महानोर यांच्या विशेषांकाचे अनावरण तसेच वसंत भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी वाङ्मय मंडळाचा उद्देश समजावून सांगितला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठीचे हे मुक्त व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचनाशी नाळ जोडून महाविद्यालयाची वांङ्मय संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. ‘संस्कार’ वार्षिक अंकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. संपादक प्रा.प्रकाश खाडे यांनी विद्यार्थ्यांना कथा, कविता, प्रवासवर्णन, लेख इ. लिहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तातोबा बदामे यांनी केले तर आभार प्रा.रमेश मोटे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल आणि प्रा.सविता कोळेकर यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव, नॅक समन्वयक डॉ. मेघा पाटील, डॉ.शहाजी पाटील, प्रा.ए.आर.पाटील, प्रा.वर्षा जगदाळे, प्रा.आर. जी.रेळेकर यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवकवर्ग, विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.