सांगली, दि.16 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) लट्ठे एज्यूकेशन सोसायटीच्या नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेजचे ग्रंथपाल प्रा.राहुल लेंजे यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन, अभियांत्रिकीय, वैद्यकीय,अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व शाळेमध्ये कार्य करणाऱ्या ग्रंथपालाना तसेच नेट, सेट, पीएचडी, झालेल्या प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी डॉ. रवींद्र भताने, सचिव प्रा. ज्ञानेश्वर हिलाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. “ग्रंथपालाच्या हक्कासाठी आमचा लढा” हे ब्रीदवाक्य घेऊन संघटनेची वाटचाल सुरु आहे. अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या दोन्ही पदाचा शासन निर्णय तात्काळ काढावा. यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे.
या नियुक्तीबद्दल प्रा.राहुल लेंजे यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.व्ही.पाटील व उपप्राचार्य डॉ.एस.डी.पाटील यांनी त्याचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. प्रा.राहुल लेंजे यांचा ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक यांच्या प्रश्नाबद्दलचा असलेला सखोल अभ्यास व हे प्रश्न पोटतिडकीने मांडण्याची असलेली त्यांची वृत्ती यामुळे या महत्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. ग्रंथपाल पद भरती संदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा आहे. प्रा.राहुल लेंजे यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
