मणिपूर घटनेच्या निषेधार्थ अंनिसच्या वतीने तासगावात निदर्शने

तासगाव, मंगळवार दि. 25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणिपूर घटनेच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तासगाव शाखच्या वतीने शहरातील सिद्धेश्वर चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जेष्ठ विचारवंत लेखक प्रा.डॉ.बाबुराव गुरव म्हणाले की स्वातंत्र्य चळवळीत बहुजन कष्टकरी दलित आदिवासी सर्वांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले. त्यातूनच पुढे भारतीय संविधान निर्माण झाले. हे संविधान सर्वांना सन्मानाने जीवन जगण्याची हमी देतो. पण सध्याचे शासनाला संविधान नष्ट करून झुंडी निर्माण करायच्या आहेत. म्हणून मणिपूर सारख्या महिलांना नग्न करून धिंड काढून, सामूहिक बलात्कार करण्याच्या घृणास्पद घटना घडत आहेत. आणि याला केंद्र शासनाची मूक संमती दिसत आहे. याचा निषेध आणि कृती सर्व भारतीयांकडून झाली पाहिजे. अंनिस च्या तालुकाध्यक्ष माजी सभापती छायाताई खरमाटे म्हणाल्या, स्त्री म्हणून आम्हाला लाज वाटते. समाजातील स्त्रिया आणि मुली प्रचंड भीती अश्या घटनेमुळे प्रचंड दडपणाखाली जात आहेत. आम्हाला असला समाज नको आहे. महिला आणि सर्वच थरातील समाज घटकासाठी एक सुरक्षित वातावरण पाहिजे आहे. यासाठी पुढे येऊन महिला, मुली आणि संवेदनशील लोकांनी बोलले पाहिजे. अंनिस च्या तालुका उपाध्यक्ष हेमलता बागवडे यांनी मला माझ्या मणिपूर भगिनींसाठी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करता आला. यावेळी अनेक वक्त्यांनी आपली तीव्र भावना व्यक्त करून मणिपूर च्या भगिनींना न्याय मिळाला पाहिजे तसेच मणिपूर आणि इतर राज्यांचा प्रश्न केंद्राने तातडीने लक्ष देऊन सोडवला पाहिजे अशी मागणी केली. सभेसाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. अंनिस सोबत राष्ट सेवा दल आणि तासगाव मधील इतर पुरोगामी संघटना यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. निषेध सभेनंतर तहसीलदार रवींद्र रांजणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी फारुख गवंडी, अमर खोत, बाबुराव जाधव, अविनाश घोडके, संदेश भंडारे, डॉ कविता जाधव, संचिता सावंत, नूतन परीट, श्रेया परीट, समीर कोळी, पांडुरंग जाधव, प्रा.वासुदेव गुरव, निसार मुल्ला, विशाल खाडे, डॉ मनीषा माळी, हणमंत आण्णा सूर्यवंशी, रोहित शिंदे, स्नेहल गुरव, दत्तात्रय सपकाळ, डॉ सतिश पवार, शशिकांत डांगे उपस्थित होते.