मणेराजुरी, दि. 20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील मणेराजूरीत येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत तब्बल 15 जणांना चावा घेतला आहे. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर चार ते पाच जनावरांनाही या पिसाळलेल्या कु्त्र्याने चावा घेतला आहे. गंभीर जखमी झालेल्या लोकांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्याने पहाटे-पहाटे धुमाकूळ घातला. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या ग्रामस्थांना या कुत्र्याने लक्ष केले. एका व्यक्तीच्या हाताची बोटे तुटली तर काहींचे शरीराचे लचके काढले आहेत. यल्लमा मंदिर परिसरात या कुत्र्याने काही जनावरांना लक्ष केले. जखमी झालेल्या लोकांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या परिसरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांच्यातून होत आहे.
