मणेराजुरीत मोटारसायकल व कंटेनर अपघातात एक ठार, एक जखमी

तासगाव, दि.29 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणेराजुरी ता. तासगाव येथे  थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. या अपघातात मोटारसायकल वर मागे बसलेला लहान मुलगा जखमी झाला आहे. संजय विष्णू मोरे ( वय ६५ ), रा.वासुंबे ता. तासगाव असे मोटारसायकलस्वाराचे नाव आहे, तर या अपघातात त्यांचा नातू सोहम जमदाडे (वय 7) रा. देवराष्ट्रे ता. कडेगाव हा जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी दु.12 च्या दरम्यान झाला असून त्याची तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी, संजय मोरे व नातू सोहम जमदाडे हे  दोघजण वासुंबे येथून सप्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH 10 AZ8648 वरून गव्हाण येथील नातेवाईकाकडे चालले होते. याचवेळी मणेराजूरी हायस्कूलजवळील स्मशानभूमी जवळ MH 44 U 1054 हा कंटेनर रस्त्याकडेला थांबला होता. मोरे यांना हा कंटेनर न दिसल्याने त्यांचा मोटारसायकलचा ताबा सुटून कंटेनरच्या डाव्या बाजूला धडक बसली. धडक इतकी मोठी होती कि त्यामुळे त्यांचा अति रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला तर नातू सोहम जमदाडे हा गंभीर जखमी झाला त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.