मातंग समाज राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येणार का..?

सचिन साठे यांचं राजकीय भवितव्य काय…?

सांगली, रविवार दि.6 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) (लेखणीपुत्र – कुलदीप देवकुळे) सध्या सर्वत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठया प्रमाणात, अभूतपूर्व उत्साहात संपन्न होत आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ह्यांचं कार्यकर्तृत्व,त्यांचे संपूर्ण आयुष्य मानवतावादी,परिवर्तनवादी चळवळीतील ‘दीपस्तंभ’ बनून राहिलं आहे. बुद्ध,कबीर,शिवराय, फुले,आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या दैदिप्यमान वाटेवरील एक वाटसरू’ म्हणून अण्णा भाऊ साठे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि याच जगविख्यात साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांना आपला समाजपुरुष, दैवत, प्रेरणास्थान म्हणून मातंग समाजाने स्वीकारलं आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती म्हणून असलेल्या एकोणसाठ (59) जातींपैकी लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकावर असणारा मातंग समाज आहे. महाराष्ट्रातील निवडणूकांच्या प्रक्रियेतील दखलपात्र समाज असूनही नेहमीच राजकीय पक्ष व राज्यकर्त्यांनी मातंग समाजाला जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवलं आहे. त्याचीही अनेक अर्थानी असंख्य कारणं आहेत. इतर अनेक समाजाच्या सारखेच मातंग समाजाच्या असंख्य पक्ष,संस्था, संघटना, संघ,महासंघ आहेत. मात्र ह्या सर्वांपेक्षा आजच्या घडीला सर्वात जास्त ताकदवान म्हणून सचिन साठे यांचा उल्लेख करावा लागेल.सचिन साठे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात नवं असेलही कदाचित मात्र महाराष्ट्राच्या समाजकारणात रुळलेलं आहे. कारणही स्वाभाविक आहे.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे. परंतु ते अण्णा भाऊ यांचे मोठे बंधू सुप्रसिद्ध साहित्यिक शंकर भाऊ साठे यांचे नातू आहेत. असे असले तरी अण्णा भाऊ साठे यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्य यांनी एकत्रितरीत्या अण्णा भाऊ साठे यांचा सामाजिक राजकीय वैचारिक वारस म्हणून सचिन भाऊ साठे यांना पुढं केलेलं आहे.सचिन साठे हे सामाजिक प्रबोधन परिवर्तनवादी चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्ष सातत्याने काम करीत आहेत. गेल्या सात आठ वर्षांपूर्वी त्यांनी मानवहित लोकशाही पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रातील तमाम मागासवर्गीय दीनदलित वंचित बहुजन गोरगरीब कष्टकऱ्यांच्या वाडी वस्तीवरती राहणाऱ्या विशेषतः मातंग समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. असंख्य ठिकाणी प्रबोधन मेळावे, समाजोपयोगी परिषदा, अन्यायाविरुद्ध केलेली असंख्य यशस्वी आंदोलन यामुळे मानवहित लोकशाही पक्ष हा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह गाव खेड्यांपर्यंत पोहोचला; मात्र अजूनही महाराष्ट्रातील प्रस्थापित प्रचलित असणारे पक्ष, संस्था यांनी सचिन साठे आणि त्यांच्या पक्षाला झाकोळण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील काही प्रमुख पक्षाने निवडणुकीच्या वेळी मात्र आवर्जून मातंग समाजाचा, सचिन साठे आणि मानवहित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून फायदा घेतला. निवडणुकांच्या वेळी जशा पद्धतीने मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासन दिली जातात तसेच आश्वासन सचिन साठे आणि संपूर्ण मातंग समाजाला देण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी असेल; मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणारे स्मारक असेल, अण्णाभाऊंच्या साहित्याचे प्रकाशन असेल, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावे सुरू असलेले महामंडळ किंवा पुरस्कार असेल अशा सर्वच पातळीवरती घोर निराशा मातंग समाजाच्या पदरी आली आणि त्यातही अतिशय संवेदनशील विषय म्हणजे अबकड वर्गीकरणाचा मुद्दा आणि बार्टी’च्या धर्तीवर आर्टी’ची स्थापना करणे ह्या प्रमुख मागण्यांसाठी मातंग समाजाची होत असणारी वारंवार अवहेलना सुद्धा कारणीभूत आहे. जगविख्यात साहित्यिक अण्णाभाऊ साठे संपूर्ण विश्वाला समजले मात्र महाराष्ट्राला समजले नाहीत. त्यांचा यथोचित सन्मान झाला नाही, ही निराशेची भावना मातंग समाजाच्या त्याचबरोबर सचिन साठे यांच्यासह संपूर्ण अण्णा भाऊंच्या कुटुंबीयांच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्रातही कोणताच पक्ष, प्रस्थापित राज्यकर्ते अण्णाभाऊंची आणि मातंग समाजाची दखल घेत नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि अशाच राजकीय दृष्ट्या आपली स्वतंत्र अस्मिता जागृत करत असताना, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पोकळी निर्माण होत असताना हि पोकळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भरून काढली आणि एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव जन्मभूमीत आले. राजकारणामध्ये मातंग समाजाला खात्रीशीरपणे न्याय देऊ. मातंग समाजाला सोबत घेऊ अशी घोषणा केली. आज अखेर महाराष्ट्राच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने वाटेगाव येथे येण्याचा शब्द देऊनही न पाळल्यामुळे मातंग समाज या सर्व गोष्टींविषयी कमालीचा उदासीन असतानाच एका परराज्यातील मुख्यमंत्र्यांचे वाटेगाव मध्ये जयंतीच्या निमित्ताने येणे ही फार मोठी राजकीय दृष्ट्या मातंग समाजाला पोषक अशी गोष्ट आहे. आणि या अर्थाने सचिन साठे हे राजकारणाच्या पटावर आलेत.मातंग समाजाची सामाजिक- राजकीय चळवळ एका वेगळ्या उंचीवर आणि उंबरठ्यावर उभी आहे. महाराष्ट्रातील दलित मागासवर्गीय अपेक्षितांच्या प्रश्नांवर,अगदी स्पष्टच सांगायचे झाल्यास अनुसूचित जातीतील 59 जातींचे नेतृत्व करण्याची क्षमता मातंग समाजामध्ये निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर रामोशी बेडर पारधी अशा समाज, समूहांचे सुद्धा नेतृत्व मातंग समाज करतो आहे. याचबरोबर सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक क्रीडा प्रशासन उद्योग व्यवसाय सहकार अशा सर्वच क्षेत्रात मातंग समाज करत असलेली घोडदौड स्पष्टपणे दिसते आहे. कोणतीही चळवळ जेव्हा उभी राहते, आक्रमक सक्षमपणे एकजूट दाखवून प्रश्न निर्भीडपणे मांडते. जगाच्या पटलावर उठून दिसते तेव्हा तिला अनेक घटक जबाबदार असतात. मातंग समाजाची चळवळ ही अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभी राहिल्याचं पाहायला मिळते. परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मातंग समाज आणि मातंग समाजाचे महापुरुष, समाजपुरुष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे, ज्ञानज्योती मुक्ता साळवे अशा अस्मितांची जाणीवपूर्वक केलेली उपेक्षा आणि अपमान जास्त कारणीभूत आहे.एकंदरीतच, या मातंग समाजाच्या सर्व सामाजिक राजकीय प्रवाहांचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की फार काळ मातंग समाज राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहू शकत नाही किंबहुना त्यांना कोणीही दूर ठेवू शकत नाही. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा वारसदार म्हणून सचिन साठे यांना संपूर्ण समाज,राज्य, आणि देश सुद्धा स्वीकारेल. या मराठी महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय संस्कृतीमध्ये महापुरुषांच्या वारसदारांना स्वीकारण्याची परंपरा आहे. तसेच सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा वारस म्हणून सचिन साठे यांना स्वीकारलं जाईलच मात्र स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी मात्र त्यांची स्वतःची असेल. तूर्तास इतकंच.!.. लेखणीपुत्र