यशवंतराच्या जन्मघरी श्रोते रंगले काव्यरंगात

उपेक्षित, शेतकरी, महिला, महागाई प्रश्नावर साहित्यिकांचा जोरदार प्रहार

देवराष्ट्रे, दि. १५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या देवराष्ट्रे येथील जन्मघरी झालेल्या कविसंमेलनात मराठवाडा , सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यिकांनी उपस्थिती लावली. रंगपंचमीच्या आदल्या दिवशीच साहित्यिकांनी काव्यरंगांची उधळण करीत श्रोत्यांना चिंब केले. अनेक कवींनी आपल्या कवितेतून स्त्री भ्रूण हत्येवर प्रहार तर स्त्री शक्तीचा जागर केला . संमेलनात शेतकरी आत्महत्या , महागाई याविषयाला स्पर्श करीत राजकीय विडंबनाने संमेलनात चांगलीच रंगत भरली .सुरेशकुमार लोंढे (मोडनिंब जि. सोलापूर ) यांचे अध्यक्षतेखालील यशवंत कवी संमेलन चांगलेच रंगले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, केंद्र – देवराष्ट्रे व यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनी, देवराष्ट्रे यांचे संयुक्त विद्यमाने यशवंतरावांच्या जन्मस्थळी ‘ यशवंत कवी संमेलन ‘ आयोजित करण्यात आले होते . संमेलनाचे यंदाचे नववे वर्ष होते . संमेलनाचे उदघाटन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद लाड यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. संमेलनाध्यक्ष सुरेशकुमार लोंढे यांच्याहस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.प्रभाकर साळेगावकर , राजेसाहेब कदम ,प्रा. अनिल चवळे , सरपंच निर्मला बोडरे , उपसरपंच बाबुराव मोरे ,ऍड.सुभाष पाटील, क्रांतीचे संचालक आप्पासाहेब जाधव, दि.बा.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी विठामाता चव्हाण पुतळा ते यशवंतरावांचे जन्मघर अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली . यशवंतराव हायस्कुलच्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाने दिंडीची शोभा वाढविली. संमेलनाध्यक्ष सुरेशकुमार लोंढे म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक म्हणून मोठे होते. महाराष्ट्र घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यशवंतरावांच्या साहित्याचा वारसा साहित्यिक पुढे नेतील असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या वात्रटिका व कवितेने उपस्थितांची वाहवा मिळविली. स्वागताध्यक्ष शरद लाड यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी येथे येवून साहित्यसेवा करणाऱ्या मराठवाड्यातील या साहित्यिकांचे विशेष कौतुक केले. या कविसंमेलनाचे स्वरूप वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संमेलनात गावकऱ्यांनी मोठा सहभाग द्यावा असे आवाहन त्यांनी केले. यशवंतराव हायस्कुलची विद्यार्थिनी सोनिया सपकाळ हिच्या यशवंतराव चव्हाण पोवाडयाने संमेलनाची सुरुवात झाली. राजेसाहेब कदम (अहमदपूर ) यांनीे संमेलनाचे बहारदार सूत्र संचालन केले . जेष्ठ विडंबन कवी प्रभाकर साळेगावकर (माजलगाव) यांनी ‘शूर आम्ही सरकार आम्हाला काय कुणाची भीती’ हे विडंबन सादर केले.प्रा. अनिल चवळे आपल्या कवितेतून पर्यावरणाचे महत्व विशद केले. संदीप नाझरे यांनी ‘ बाप आता शेतात येत नाही’ या कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा मांडली.राजेसाहेब कदम यांच्या कवितेला श्रोत्यांनी टाळ्यांची विशेष दाद दिली .विश्वनाथ गायकवाड, सागर गोतपागर, सु.धों.मोहिते, सत्येंद्र कामत, सदानंद माळी, प्रकाश नाईक (कोडोली), एम.एस.जाधव (रुई), सिराज शिकलगार, नामदेव जाधव, अशोक पवार, सतीश लोखंडे, जयवंत आवटे, शांतीनाथ मांगले, पूनम सावंत, महेबूब जमादार, सुनीता कुलकर्णी, आनंदहरी, बजरंग गावडे यांच्यासह अनेक कवींनी सादर केलेल्या कवितांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. स्वागत व प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ यांनी केले. आभार दीपक पवार यांनी मानले. कार्यक्रमात अमृतवेलचे धर्मेंद्र पवार, डी. डी. पाटील, धोंडीराम महिंद, ग्रामपंचायत सदस्य धैर्यशील पाटील, गोरख मिसाळ, विमल पवार, बबन ठोंबरे, संदीप मोहिते, प्रदीप मोहिते, दीपक शिंदे, विनायक साळुंखे, मंदार वर्तक, रविंद्र शिंदे, संतोष होनमाने, मयुर काळे आदी उपस्थित होते.