तासगाव, दि. 31 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथे जवळ गुहागर -विजापूर या राज्यमार्गावर शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कर्नाटक येथील रडारेड्डी (ता. अथणी) येथील संभाजी हाजीबा सावंत (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो धडकेत पलटी झाला. या अपघाताची तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, संभाजी सावंत हे हीरो डीलक्स (क्र.केए 23 ईजे 6795) या दुचाकीवरून तासगावच्या दिशेने नातेवाईकांच्याकडे निघाले होते. तर वाळवा येथून द्राक्षे भरून आंध्रप्रदेश मधील टेम्पो(क्र.एपी 39 युसी 0169) हा तासगाव कडून कवठेमंकाळच्या दिशेने निघाला होता. गुहागर – विजापूर महामार्गावर मणेराजुरी आणि योगेवाडीच्या हद्दीवर, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार सावंत रस्त्यावर उडून पडले यामध्ये त्यांचा अतीरक्तस्त्राव झाल्याने जागीच मूत्यू झाला. तर द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो रस्त्याकडेला जाऊन पलटी झाला. या घटनेनंतर मणेराजुरीचे पोलीस पाटील दीपक तेली आणि योगेवाडीचे पोलीस पाटील मोहन सूर्यवंशी यांनी तासगाव पोलिसांना ही माहिती कळवली. माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा चा पंचनामा केला.

