रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती
मुंबई, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
महापुरुषांच्या बाबतीत सातत्याने वादग्रस्त विधान करून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला असून महाराष्ट्राच्या नूतन राज्यपाल पदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.
रमेश बैस यांनी या पूर्वी झारखंड राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्या अनेक वादग्रस्त विधानामुळे गेल्या अनेक दिवसापासून त्यांना रोषाचा सामना करावा लागत होता. त्यांच्या विरोधात राज्यात मोठे रान उठले होते, अनेक ठीकाणी त्यांच्या विरोधात आंदोलने झाली. राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यातूनच त्यांनी राजीनामा देण्याची ईच्छा व्यक्त केली होती.
अखेर आज त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला. त्यांच्या जागी नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांच्या झारखंड येथील राज्यपाल पदाचा अनुभव हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

