

तासगाव, दि.२८ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा)
राष्ट्रवादी हा पक्ष राजकारणापेक्षा समाजकारणास जास्त प्राधान्य देतो त्यामुळे या पक्षात युवक तरुणांना चांगली संधी मिळत आहे. असे प्रतिपादन युवक राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केले. शरद युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने तासगाव येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शरद लाड, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष विराज नाईक, प्रदेश सरचिटणीस अरुण आसबे, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, शहराध्यक्ष गजानन खुजट, ताजुद्दीन तांबोळी, युवक तालुका अध्यक्ष दत्तात्रय हावळे, शहराध्यक्ष अभिजीत पाटील, जिल्हा संघटक दीपक उनउने, नगरसेवक बाळासाहेब सावंत, सचिन पाटील, अरविंद पाटील, संदीप पाटील, महेश झांबरे, अविनाश हंकारे, सयाजी पाटील, अभिनंदन कोगनोळे यांच्यासह युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेख पुढे म्हणाले, राजकारणात सर्वोच्च स्थानापर्यंत राष्ट्रवादी पक्षच युवकांना नेऊ शकतो. आदरणीय पवार साहेब नेहमी सांगतात, युवकांनी समाजकार्यासाठी पुढे येऊन सामाजिक जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. देशामध्ये असणारी मोठी बेरोजगारी,वाढती महागाई, शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांवर वेळोवेळी सातत्याने युवक राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून विविध आंदोलने केली आहेत . आदरणीय पवार साहेब देशाचे कृषिमंत्री असताना शेतकरी हिताचे खूप चांगली निर्णय घेतले होते. त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांचे याबाबत नेहमीच मार्गदर्शन घेत असतात. पवार साहेबांचे कृषी क्षेत्रामध्ये असणारे कार्य जगात नावाजलेल आहे. साहेबांनी लाखोंना रोजगार देणारे पुण्याच्या आयटी हब निर्मिती असेल, साखर कारखाने, असंख्य उद्योग, दूध संस्था, वगैरे शेकडो उद्योग महाराष्ट्र मध्ये उभारण्यात पवार साहेबांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय पवार साहेबांनी केला.
स्वर्गीय आर आर आबांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनीच केल आहे. आर आर आबांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी पवार कुटुंबीय सर्व शक्तीनिशी पाठीशी आहे. येणाऱ्या तासगाव नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी आमदार श्रीमती सुमनताई पाटील, रोहित दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील युवा कार्यकर्ते सत्ता आपणाकडे खेचून आणतील असं मला आत्मविश्वास आहे. प्रदेश पातळीवरून येणारे सर्व उपक्रम या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवित आहात. येथील युवकांचे संघटनात्मक कार्य उल्लेखनीय आहे, असे शेख म्हणाले.
देशाचे माजी कृषिमंत्री, राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे शुक्रवारी मार्केट कमिटी परिसरात युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रमुख नेतृत्वात या यात्रेचे तासगाव तालुका युवक राष्ट्रवादी वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. सुरुवातीस मार्केट कमिटी परिसरातील स्वर्गीय आर.आर.आबा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मार्केट कमिटी हॉल येथे युवा संवाद यात्रा पार पडली
यावेळी उपाध्यक्ष शरद लाड, विराज नाईक, ताजुद्दीन तांबोळी, स्वप्निल जाधव, अभिजीत पाटील, संताजी पाटील, अक्षय धाबुगडे, विकास मस्के आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दीपक उनउने, स्वागत दत्तात्रय हावळे, सचिन पाटील यांनी केले तर आभार सलमान मुजावर यांनी मानले.