रोजगार निर्मितीसाठी मुकबधिर दिव्यांग महिलेस शिवण यंत्राचे वाटप

निल फाउंडेशन व नंबर वन न्युज चॅनेल यांचा गरजू महिलेस मदतीचा हात

अकोला, दिनांक 24 जून 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत हाती घेऊन गेल्या तीन वर्षांपासून समाजातील उपेक्षित आणि गरजु महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित समाजकार्यात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलेल्या अकोला येथील निल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कुसुम अहिर या मूकबधिर दिव्यांग महिलेस शिवणयंत्र वितरित केले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमात अमरावती येथील नंबर वन न्यूज चॅनेल ने सुद्धा सहभागी होत आपली सामाजिक जबाबदारी उचलली. या उपक्रमांस राष्ट्रपती पुरस्कार सन्मानीत चिंगू ताई बोलके यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. निल फाउंडेशन गेली 3 वर्षे झाले या परिसरातील गरजू महिलांना शिलाई काम आणि ब्युटी पार्लर चे मोफत प्रशिक्षण वर्ग चालवीत आहे. गरजू महिलांना रोजगार निर्मिती साठी योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून कुटुंबासाठी आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करून त्यांना आत्मनिर्भर करीत आहे. फाउंडेशन फक्त गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत नाही तर त्यांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण वर्ग चालवीत आहेत. कुसूम अहिर या जन्मापासूनच मूकबधीर आहेत त्यांना बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही. अश्या खडतर परिस्थितीत निल फाऊंडेशनने त्यांना आपल्या संस्थेमार्फत मोफत शिवण कामचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या घरची परिस्थीती अत्यंत हालाकिची असल्यामुळे त्या शिवण यंत्र घेण्यास असमर्थ होत्या त्यामुळे त्यांना निल फाऊंडेशन च्या अध्यक्षा कल्पना अस्वार यांनी त्यांना एक नवीन शिवण यंत्र घेऊन देण्याचा निर्णय घेतला त्यास नंबर न्यूज चॅनेल चे संपादक नितीन पाटील-मुळे यांनी मदत केली. या दोन्ही संस्थाच्या वतीने कुसुम अहिर यांना नुकतेच शिवण यंत्र वितरित करण्यात यावेळी सचिव आश्विनी नटकुट, वंदना काबळे, प्रशिक्षिका सुनिता ठोसर, डॉ. दिलीप काळे, संजोती मांगे, शंकर कंकार, कुसम अहिर यांचे कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. स्वागत शीतल राऊत यांनी केले. प्रास्ताविक कल्पना अस्वार यांनी केले. आभार अश्विनी नटकूट यांनी मानले.