तासगाव, दि.30 मार्च 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची खासदार संजय पाटील यांच्यावर टीका करण्याइतपत उंची नाही. यापुढे खासदारांवर आरोप करणार्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे व सुदीप खराडे यांनी दिला. शिवाय रोहित पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुढे करुन खासदारांवर आरोप करायला लावायचे बंद करावे, असेही शेंडगे व खराडे म्हणाले. तसेच तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारातीच्या कामाला मिळालेली स्थगिती खासदारांच्याच पत्राने उठली आहे. हे पत्र व त्यावरील सही खासदारांचीच आहे. त्यामध्ये काहीही बोगस नाही. त्यामुळे आरोप करणार्यांनी ते सिद्ध करावेत. अन्यथा तालुक्याची माफी मागावी, असेही आव्हान त्यांनी दिले. तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या मंजुरीवरुन भाजप – राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाचे राजकारण पेटले आहे. दोन्ही गट आमच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाल्याचे सांगत आहेत. भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सुमन पाटील व रोहित पाटील यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील व ताजुद्दीन तांबोळी यांनी खासदारांनी स्थगिती उठवायला दिलेले पत्र बोगस आहे. त्यावरील सही खासदारांची नाही, असा आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, भाजपच्या पदाधिकार्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सगळे आरोप खोडून काढले. यावेळी शेंडगे व खराडे म्हणाले, आमदार सुमन पाटील यांनी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा प्रस्ताव दिला. मात्र तो तांत्रीकदृष्ठ्या अपूर्ण असल्याने त्या कामाच्या मंजुरीला स्थगिती मिळाली होती. ही स्थगिती मिळाल्याचे आमदार गटाला माहितही नव्हते. स्थगिती उठवण्यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत. मार्च अखेरपर्यंत ही स्थगिती उठली नाही तर निधी परत जाण्याची भीती होती. त्यामुळे खासदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्याशी पत्रव्यवहार करुन स्थगिती उठवली. ही सगळी कागदपत्रे भाजपच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, स्थगिती उठवायला दिलेले खासदारांचे पत्र बोगस आहे. त्यावरील सही खासदारांची नाही. स्थगिती उठल्यानंतर सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करण्यासाठी ते पत्र कोणीतही तयार केले आहे. औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशाने स्थगिती उठली आहे, हे सगळे राष्ट्रवादीचे आरोप भाजपच्या पदाधिकार्यांनी खोडून काढले. यावेळी शेंडगे म्हणाले, आमचे नेते प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मंजुर करुन आणलेली कामे सांगितली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या स्वत:ला युवा नेते म्हणवणार्या रोहित पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायला हवे होते. मात्र ते कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना पुढे करीत आहेत. लोकांची दिशाभूल करीत आहेत. इथून पुढे त्यांनी ठामपणे पुढे यावे. जे केले ते ठामपणे सांगावे. शिवाय राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी खासदारांच्या पत्राच्या अनुषंघाने केलेले आरोप सिद्ध करुन दाखवावेत, अन्यथा त्यांनी तालुक्याची माफी मागावी, असेही आव्हान शेंडगे यांनी दिले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी तासगाव पंचायत समितीच्या कामाची स्थगिती औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने उठली आहे, असे खोटे सांगत आहेत. जर खंडपीठाच्या आदेशाने स्थगिती उठली असेल तर त्यांनी त्यासंदर्भात एखादातरी कागद तालुक्यातील जनतेसमोर ठेवावा, असे आव्हान सुदीप खराडे यांनी दिले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, माजी पंचायत समिती सुनिल जाधव, शशिकांत जमदाडे, बाबासाहेब पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.