वादळी वाऱ्यामुळे तासगाव मधील द्राक्षबागा भुईसपाट..

तासगाव, दि.5 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे व्यापारी द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडून पळून जात आहेत.तर दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागांना आलेले द्राक्षपिक भुईसपाट होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी पार मेटाकुटीला आलेला आहे. तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील विकास शिंदे व मनेराजुरी येथील संभाजी जाधव यांच्या द्राक्षबागा कालपरवाच्या वादळी वाऱ्यामुळे कोसळल्या आहेत. यात चिंचणी येथील विकास शिंदे यांच्या दोन एकर क्षेत्राचे अंदाजे 18 ते 20 लाख रुपयांचे व मणेराजुरी येथील संभाजी जाधव यांच्या एक एकराचे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.तर दोनच दिवसांपूर्वी मांजर्डे येथील बाळासो मोहिते यांची एक एकर द्राक्षबाग सुद्धा वादळी वाऱ्यामुळे भुई सपाट होऊन त्यांचे सुद्धा सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावेळी नुकसानग्रस्त द्राक्ष पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तहसीलदारांना झालेल्या नुकसानग्रस्त द्राक्ष पिकांची फोनवरून माहिती देऊन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. वर्षभर राब-राब राबून सोसायट्यांचा कर्जाचा बोजा,गावातील स्थानिक सावकारांचा कर्जाचा डोंगर, औषध दुकानांची उधारी या अशा आसमानी व सुलतानी संकटांमुळे कशी फेडायची हा एक यक्ष प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांनी खराब वातावरणात सुद्धा यावर्षी द्राक्ष पिक मोठ्या जोमाने पिकवले होते. खराब वातावरणामुळे हाता- तोंडाशी आलेलं द्राक्षपिक मातीमोल झाल्याने परिसरात सर्वत्र हळद व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ज्या द्राक्ष बागांना जास्त लोड आहे त्यांनी आतून तारेच्या सहाय्याने सपोर्ट देणे गरजेचे आहे. स्टे तुटू नयेत म्हणून त्याच्यावर मोठे दगड ठेवल्यास स्टे तुटण्याची शक्यता कमी असते. छाटणीच्या वेळी गंजलेल्या व खराब झालेल्या तारा वेळीच बदलल्यास नुकसान होणार नाही.