अडीच तास चक्का जाम : पाणी सुरू केल्यानंतर उपोषण स्थगित
तासगाव, मंगळवार दि.19 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील वायफळेसह 8 गावांचा आजही टेंभू योजनेत अधिकृत समावेश नाही. त्यामुळे हक्काच्या पाण्यापासून ही गावे वंचित आहेत. परिणामी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज वायफळे येथे रास्ता रोको केला. सुमारे अडीच तास तासगाव – भिवघाट हायवेवर चक्का जाम करण्यात आला. अखेर टेंभू योजनेच्या भूड येथील 5 व्या टप्प्यातून अग्रणी नदीत पाणी सोडल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. तर उपोषण स्थगित करण्यात आले. तालुक्यातील वायफळे, सावळज, डोंगरसोनी, सिद्धेवाडी, दहिवडी, यमगरवाडी, बिरणवाडी व जरंडी ही आठ गावे टेंभू योजनेच्या हक्काच्या पाण्यापासून आजही वंचित आहेत. ही गावे अधिकृतरित्या या योजनेत समाविष्ट नाहीत. मात्र आमदार सुमन पाटील यांच्यासह खासदार संजय पाटील यांनी या गावांचा समावेश झाला आहे, असे यापूर्वी अनेकवेळा सांगून शेतकऱ्यांना गंडवले आहे. गेल्या 35 वर्षापासून या भागातील शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी वारंवार रस्त्यावर उतरत आहेत. मात्र आजतागायत येथील शेतकऱ्यांना हक्काचे व शाश्वत पाणी मिळालेले नाही. या आठ गावांचा विस्तारित प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. मात्र तो अद्याप मंजूर झालेला नाही. या गावांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. वायफळेसह आठ गावातील शेतकऱ्यांनी आज तासगाव – भिवघाट हायवेवर रास्ता रोको केला. सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारून चक्काजाम केला. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुमारे अडीच तास हा चक्काजाम सुरू होता. आंदोलनात वायफळेसह आठ गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. आमदार सुमन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, सागर पाटील यांच्यासह राजीव मोरे, राजू सावंत यांच्यासह अनेकांनी या आंदोलनास पाठिंबा दिला. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. पाटोळे जोपर्यंत आंदोलकांशी चर्चा करून पाण्याबाबत ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील, विद्यमान आमदार सुमन पाटील यांच्यासह खासदार संजय पाटील यांनी गेल्या 35 वर्षात केवळ पाण्याचे राजकारण केले आहे. हा शेवटचा दुष्काळ म्हणून अनेक निवडणुका या मंडळींनी लढवल्या. जिंकल्या. मात्र आजतागायत वायफळेसह आठ गावांना हक्काचे पाणी मिळालेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात या नेत्यांना गावबंदी तसेच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी आक्रमक आंदोलकांनी दिला. दरम्यान अडीच तासाच्या रास्ता रोकोनंतर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. पाटोळे, आमदार सुमन पाटील यांच्यासह शेतकऱ्यांची सिद्धेश्वर मंदिरात बैठक झाली. बैठकीत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. जर संबंधित अधिकाऱ्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन केले तर शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ आली नसती. मात्र अधिकारी काही लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी श्री. पाटोळे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. पाटोळे यांनी वायफळेसह आठ गावांचा आज तरी टेंभू योजनेत अधिकृतरित्या समावेश नाही, असे स्पष्टपणे सांगितले. विस्तारित योजनेत या गावांचा समावेश केला असून त्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान भूड येथील पाचव्या टप्प्यातून अग्रणी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आजचे आंदोलन मागे घेतले. तर उपोषण स्थगित केले. येत्या आठ ते दहा दिवसात वायफळेसह यमगरवाडी व परिसरातील भागाला पाणी देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. आंदोलनास आर. जे. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य सभापती साहेबराव पाटील, बजरंग पाटील, सरपंच संतोष नलवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, शिवाजी पाटील, शिवाजी विकास सोसायटीचे चेअरमन विनोद पाटील, उद्धव यमगर, ग्रामपंचायत सदस्य संपत पाटील, अजित पाटील, अंकुश फाळके यांच्यासह आनंदराव पाटील, राम पाटील, कैलास यमगर, मोहन पाटील, राजेंद्र शिंदे, लक्ष्मण पाटील संतोष जाधव, सुरेंद्र शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
