शाळा व्यवस्थापन समितीचा पुढाकार, तासगाव तालुक्यातील अनोखा उपक्रम, राज्यातील गावापुढाऱ्यांनी आदर्श घ्यावा
तासगाव, दि.17 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपा मध्ये सर्व शिक्षक सहभागी झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचाही समावेश आहे. या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी गावातील स्वयंसेवक शिक्षकांना घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय वायफळे व यमगरवाडी (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी घेतला आहे. वायफळे येथील शाळा उद्यापासून (शनिवार) तर यमगरवाडी येथील शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत वायफळे येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विपुल पाटील व यमगरवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन यमगर म्हणाले, यंदाचे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आहे. थोड्या दिवसात वार्षिक परीक्षा सुरू होतील. मात्र काही वर्गांचे अभ्यासक्रम अजूनही पूर्ण झाले नाहीत. दरम्यान, परीक्षा तोंडावर असताना जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसह राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. या संपामुळे गेल्या चार दिवसांपासून शाळा बंद आहेत. शाळा बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिक्षेपूर्वी अशा पध्द्तीने शाळा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांचे मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे गरजेचे आहे. शिक्षकांचा संप अजून किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. संप असाच सुरू राहिल्यास व त्यावर तोडगा न निघाल्यास अजून काही दिवस शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही वायफळे व यमगरवाडी येथील स्वयंसेवक शिक्षकांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वायफळे येथील शाळा उद्यापासून तर यमगरवाडी येथील शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पालकांनीही आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उद्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांनी गेल्या चार दिवसांपासून शाळा बंद ठेवून संप पुकारला आहे. परीक्षा तोंडावर असताना अशा पद्धतीने शाळा बंद ठेवणे चुकीचे आहे. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांनी जरून त्यांच्या हक्कासाठी लढावे. मात्र आता उन्हाळ्यामुळे सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुटल्यानंतर व रविवारी दिवसभर शिक्षकांनी खुशाल आंदोलन करावे. त्यांच्या लढ्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यास आमचा विरोध आहे, असे मत वायफळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विपुल पाटील यांनी व्यक्त केले.