तासगाव, दि.३ फेब्रुवारी२०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा)
महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक असून वाहतूक नियमांचे पालन करणे ही स्वयंशिस्त बनली पाहिजे. तर वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी वाहतूक सुरक्षा अभियान हे सप्ताहापुरतेच मर्यादित न राहता लोकचळवळ व्हावी असे प्रतिपादन तासगाव आगार व्यवस्थापक सुनंदा देसाई यांनी केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तासगाव आगाराच्या वतीने आयोजित अपघात सुरक्षितता अभियान अंतर्गत कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या अपघातामुळे जीवितहानी होण्याबरोबरच संबंधित कुटुंबावरही परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी. वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या माध्यमातून नागरिकांकडून रस्ते व वाहतूक सुरक्षा अभियान वर्षभर राबविले गेले पाहिजे.’
यावेळी कामगार कल्याण केंद्र संचालक महेंद्र रसाळ म्हणाले, रस्ते वाहतूकीत सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे सुरक्षित वाहतूक सेवा करणारे महामंडळ आहे. अपघात टाळणेकरीता रा.प. महामंडळाकडून नेहमी उपाययोजना राबविण्यात येतात. ग्राहक पंचायत-ग्राहक न्यायालयाचे मार्गदर्शक आलमशहा मोमीन यांनी रा.प. महामंडळाच्या कर्मचा-यांवर येणार मानसिक-शारीरीक ताण कसा कमी करता येईल. आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी तसेच रा.प. महामंडाळाचे उत्पन्न वाढविणेकरीता मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्य प्राधान्य देणेबाबत प्रबोधन केले. यावेळी सहा वाहतूक निरीक्षक अनिलकुमार जगताप, प्रमुख कारागीर चंद्रशेखर जोशी, संगीता शेंडगे तसेच रा.प. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
