विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत प्राचार्य-डॉ.मिलिंद हुजरे

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘स्त्री सुरक्षा’ या विषयावर मुक्त विचारमंच

तासगाव, दि. 27 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पालकांनी कुटुंबात मुला मुलींना वाढविताना समान संधी द्यावी. मुलींना बंधनात ठेवून मुलांना मोकळी देऊ नये. मुलांवर योग्य संस्कार करावेत. मुलींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होवून स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय,तासगाव येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मुक्त विचार मंचच्या कार्यक्रमात ‘स्त्री सुरक्षा’ या विषयावर केले. ते म्हणाले मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या आहेत परंतु आजही समाजात त्या सुरक्षित दिसत नाहीत. मानसिक दृष्ट्या स्त्रियांना मोकळीक दिली पाहिजे असे सांगून मुलींनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले. मुक्त विचार मंचाच्या स्पर्धेत कु.प्रांजल कांबळे (बारावी विज्ञान) हिने प्रथम क्रमांक, कु.श्रावणी संकपाळ (बारावी कला) हिने द्वितीय क्रमांक मिळवला तर तिसरा क्रमांक कु.दिव्या धुमाळ (बीए भाग ३) व कु.पाकीजा तांबोळी यांना विभागून देण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.शहाजी पाटील, कॅप्टन डॉ.विनोदकुमार कुंभार, डॉ.केदार उंडाळे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.मिनाक्षी मुसळे यांनी केले तर आभार सहाय्यक ग्रंथपाल प्रा.सुनिता महाडीक यांनी मानले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. यावेळी उपप्राचार्य जे.ए.यादव यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग, विद्यार्थी – विद्यार्थिनी व स्पर्धक उपस्थित होते.