विद्यार्थ्यांनी मानसिक दबाव न घेता परिक्षेला सामोरे जावे-विशाल पाटील

येळावीत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

येळावी, दि. २७ फेब्रुवारी २०२३ (प्रशांत सावंत – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
विद्यार्थ्यांनी मानसिक दबाव न घेता आगामी परिक्षेला सामोरे जावे. विद्यार्थ्यांना आपल्याला नेमके कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचे आहे, याची दिशा इयत्ता दहावीतील परिक्षेच्या निकालानंतरच विद्यार्थ्यांच्या आयुष्याची ठरते. दहावीनंतरचे वर्ष निर्णायक असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीकोनातून बघावे, असे प्रतिपादन वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे संचालक व सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे संचालक विशाल पाटील यांनी केले. बाबासाहेब पाटील हायस्कूलच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा पार पड्ला, त्यावेळी ते बोलत होते. विशाल पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, विद्यार्थी आमच्या संस्थेतून पुढच्या शैक्षणिक संस्थेत गेले तरी आपली नाती तुटणार नाहीत. नैतिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक कल्याणासाठी संस्था सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील. दहावी परिक्षेनंतर लगेचच आपण सर्वांनी बसून विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसंदर्भात चर्चा – विचारविनिमय करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी संस्था सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पंडीतराव भोसले होते. निरोपसमारंभ कार्यक्रमाचे औचित्य साधून सन 2022- 23 सालातील विद्यार्थ्यांनी शाळेला एलईडी टीव्ही खरेदीसाठी योगदान दिले. यावेळी इयत्ता 10 वी चे वर्गशिक्षक, विद्यार्थी – विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले.