पी.डी.व्ही.पी.महाविद्यालयात स्वच्छता विषयक घोषवाक्य स्पर्धा उत्साहात संपन्न
तासगाव, शुक्रवार दि.22 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) स्वच्छ सुंदर असेल परिसर तर तेथे आरोग्य नांदेल निरंतर. विद्यार्थ्यांनी स्वच्छते विषयी सजग राहावे असे प्रतिपादन प्रा.डी.एच.पाटील यांनी केले. येथील पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद सांगली यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ व स्वच्छता पंधरवड्याच्या निमिताने ‘स्वच्छता ही सेवा २०२३ ‘ या उपक्रमांतर्गत स्वच्छतेविषयी घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रा. पाटील पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा जोपासली पाहिजे आपला परिसर स्वच्छ ठेवून निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. अनेक रोगावरील मूळ औषध म्हणजे स्वच्छता असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट तयार करून त्यांना पाच घोषवाक्य तयार करण्यास सांगितले. प्रथम क्रमांक अकरावी कला शाखा तुकडी ब च्या मुलींनी मिळवला, द्वितीय क्रमांक बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनींनी मिळवला, तिसरा क्रमांक बारावी कला शाखेच्या तुकडी ब च्या विद्यार्थिनींनी मिळवला तर उत्तेजनार्थ क्रमांक अकरावी कला शाखेच्या तुकडी ब च्या विद्यार्थ्यांनी मिळविला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा.एस.डी.पाटील यांनी स्वच्छता मिशन मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले तर आभार प्रा.सौ.एस.बी.पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
