शहीद महाविद्यालयातून विविध प्रशासकीय अधिकारी घडावेत – महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिव डॉ. सुवर्णा खरात

शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा द्वितीय पदवी प्रदान सोहळा डॉ. रजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न; साधना घाटगे, सुचेताताई कोरगावकर, दीपा शिपुरकर यांचा वीरनारी पुरस्काराने गौरव

कोल्हापूर, दि. ९ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) ग्रामीण भागातून शिक्षण घेत या महाविद्यालयातील मुलींनी वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये घेतलेली ही भरारी म्हणजे कोल्हापूर सारख्या दुर्गम भागातून डॉ. जगन्नाथ पाटील यांनी पाहिलेल्या स्वप्नांची परिपूर्ती आहे. या मुली वेगवेगळ्या ठिकाणी रुजू होत आहेत ही बाब महत्वपूर्ण आहेच, परंतु याच जिद्दीने भविष्यात येथील विद्यार्थिनी प्रशासकीय सेवेत दिसाव्यात’ असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले. तिटवे जि. कोल्हापूर येथील शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या द्वितीय पदवीप्रदान कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत होते. डॉ.खरात पुढे म्हणाल्या, ‘आयुष्यात नेहमी भीती बाजूला सारून वाटचाल करत रहा. राज्य अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची भीती मनातून काढून टाकून मोठ्या उमेदीने आपण या स्पर्धेत यश संपादन करू शकता. अध्यक्षीय भाषणात डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी एकाच वेळी एका विद्यार्थिनीची तीन वेगवेगळ्या कंपन्यांसाठी निवड होणे ही अनन्यसाधारण बाब आहे. स्थापनेपासून या महाविद्यालयाने अनेक अडथळे पार केलेले आहेत. त्यामुळे संघर्ष हा महत्वाचा का असतो? याची प्रचीती येते. कारण संघर्षाशिवाय यशाची प्राप्ती आपण अनुभवू शकत नाही. आजच्या युवा पिढीच्या शिक्षणाच्या गरजा वेगळ्या आहेत. एज्युकेशन युगामध्ये बुद्धकांच्या सोबतच संवेदनक्षमता आणि टीम करण्याची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. या गरजा ओळखूनच सुरुवातीपासून या महाविद्यालयात ग्लोबल क्लासरूमची निर्मिती केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ही प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही शिक्षण घेत असताना ज्या संस्थेने, समाजाने आपल्याला मदत केली याचे स्मरण ठेऊन वाटचाल करत रहा’ असे नमूद केले. संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ज्ञ डॉ . जगन्नाथ पाटील म्हणाले ‘ पहिल्या दोन वर्षातच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रुजू झाल्या आहेत. हे करून दाखवण्याची ताकद या कोल्हापूरच्या परिसरात आहे. कोल्हापूरच्या इतिहासात स्थापनेच्या पहिल्याच वर्षी पंचावन्न विद्यार्थिनींची प्लेसमेंट करणारे एकमेव महाविद्यालय म्हणजे हे शहीद महाविद्यालय आहे. आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण याबरोबरच योग्य संस्कार व प्रशिक्षण मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थिनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला मात करत यशस्वी होऊ शकतात हे शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे. पसायदान आणि एसएनडीटी विद्यापीठ गीताने या सोहळ्यास प्रारंभ झाला. गत चार वर्षातील विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य प्रशांत पालकर यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या सोहळ्यात शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापिका वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील व मान्यवरांच्या हस्ते “वीरनारी पुरस्कार 2023” प्रदान करण्यात आले. समाजसेवा, उद्योग, आरोग्य यांसह विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव या निमित्ताने केला जातो. सुप्रसिद्ध उद्योजिका सौ. साधना घाटगे (घाटगे-पाटील उद्योग समूह), उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुचेताताई कोरगावकर, ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते ‘वीरनारी सन्मान २०२३’ चे गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संगणकशास्त्र ,पत्रकारिता, विज्ञान विभागाच्या विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आल्या. टाटा मोटर्स, विप्रो सारख्या विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कंपन्यात निवड झालेल्या विधार्थिनींचा गौरव करण्यात आला. सत्कारमूर्ती सौ. साधना घाटगे यांनी अडथळ्यांवर मात करत पुढे गेलो तरच आपण घडत जातो, आणि या विद्यार्थिनी निश्चितपणे सगळे अडथळे पार करून उंच भरारी घेतील असा विश्वास व्यक्त केला. खेड्यात असूनही संस्थेने पार केलेला हा प्रवास नावाजण्या सारखाच आहे, असे सुचेताताई कोरगावकर म्हणाल्या. तरुण पिढी ने व्यसनाधीनतेपासून लांब राहायला हवे. व्यसनाधीनते मधून वेगवेगळे आजार पसरतात, कोल्हापूरमध्ये सुरु झालेली थुंकी मुक्तीची चळवळ ही त्यापैकीच एक आहे. असेच न पटणाऱ्या गोष्टींच्या विरोधात ठाम उभे राहायला शिका असे मत दीपा शिपुरकर यांनी व्यक्त केले. शहीद महाविद्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११० गावांमधील ९०० हून अधिक विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. येथे पारंपारिक शिक्षणाऐवजी कॉम्प्युटर सायन्स, मास मीडिया, डी. एम. एल. टी., कॉम्प्युटर सायन्स, बी.एस्सी मायक्रोबायोलॉजी व फूड अँड न्यूट्रिशन, एम.एस्सी कम्प्युटर सायन्स, एम.एस्सी मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी रसायनशास्त्र असे आधुनिक, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळेच परीक्षेपूर्वीच विद्यार्थिनींना मोठमोठ्या कंपन्या मधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थिनी टी.सी.एस., कॅप्जेमिनी सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत. संस्थेचे शहीद पब्लिक स्कूल गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. विद्यानिकेतन गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शहीद पब्लिक स्कूलने अनेक इंजिनियर्स ,डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील यशवंत घडविले आहेत. त्यामुळे केजीपासून ते पीजीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध असलेले एक अतिशय सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे शैक्षणिक संकुल शहीद परिवाराने तिटवे सारख्या खेडेगावात उभे केले आहे.याचे पदवी प्रदान समारंभातील मान्यवरांनी कौतुक केले. या सोहळ्याला आजी माजी विद्यार्थिंनी, हितचिंतक, पालक आणि शैक्षणिक – माध्यम – सांस्कृतिक विश्वातील मान्यवर उपस्थित होते . सुत्र संचलन माधुरी सनगर, संहिता पोवार व शुभांगी वैद्य यांनी केले तर आभार डॉ सुधीर कुलकर्णी यांनी मानले.