शिराळा, मंगळवार दि. 25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली परीसरात गेल्या आठवडाभरापासुन दमदार पाऊस कोसळत आहे. चांदोली धरणक्षेत्रात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात ५७ मिलीमीटर इतका पाऊस झाला असुन धरण २६.६६ टि एम सी म्हणजेच ७७.५० टक्के इतके भरले आहे. मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातुन १२३९८ क्युसेक्स पाण्याची आवक धरणामध्ये होत असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढ होत असुन मंगळवारी सकाळी आठ वाजता धरणाची पाणीपातळी ६१८.३५ मीटर इतकी झाली आहे.
सध्या चांदोली धरणाच्या विजनिर्मिती केंद्रातुन ८९७ क्युसेक्स पाणी वारणानदिपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे वारणेच्या पातळीतही वाढ होत असुन वारणानदी दुथडी भरुन वहात आहे. मुसळधार पावसामुळे येथील डोंगरमाथ्यावरुन प्रवाहीत झालेले धबधबे पर्यटकांना आकर्षीत करु लागले आहेत तसेच येथील डोंगरही हिरवाईने सजु लागले असुन चांदोलीच्या निसर्गसौंदर्यात भर पडु लागली आहे.

