शिराळा बिळाशीचे बंड हे स्वातंत्र्य चळवळीतील सुवर्णपान- ग्रामीण कथाकार – बाबासाहेब परीट

शिराळा, 19 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा-नथुराम कुंभार) इतिहासाच्या पायावर देशाचा वर्तमान आणि भविष्य उभं असतं. 1930 चे बिळाशीचे बंड हे बहुजनांच्या कर्तबगारीचे निशाण आहे. बिळाशीचे बंड हे स्वातंत्र्य चळवळीतील सुवर्णपान असल्याचे मत ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, वारणा प्रसाद विद्यालय बिळाशी व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १८जुलै ते पाच सप्टेंबर हा बिळाशी बंडाचा कार्यकाल होयकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती आनंदराव पाटील हे होते. यावेळी बिळाशीच्या उपसरपंच सुवर्णा विजय साळुंखे, मुख्याध्यापक व्हि.एम. पाटील, बी.एम.पाटील, ग्रामसेवक सचिन खोत, सदस्य चंद्रकांत साळुंखे, अभिजीत देशमाने आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बाबासाहेब परीट पुढे म्हणाले, असहकार, सविनय कायदेभंग, चले जाव चळवळ या तीनही चळवळीत बिळाशीचे योगदान मोठे आहे. ब्रिटिश आमदानीत 49 दिवस तिरंगा फडकवण्याची बहादुरी करणारी प्रकाश बोट म्हणजे बिळाशीची स्वातंत्र्य चळवळ होय. बर्डे गुरुजी, गणपतराव दादा पाटील, बाबुराव दादा चरणकर, रंगनाथ दांडेकर, तात्या लोहार, गोविंद कृष्णा पाटील, दत्तात्रय पोतदार, बापू मुलाणी, मुक्ताबाई साठे, मैनाबाई यमगर राजूबई मस्कर, धोंडूबाई मस्कर यांच्या सामूहिक प्रयत्नाने हे बंड यशस्वी झाले. धोंडी संतू कुंभार, शंकर भाऊ चांभार, मारुती ज्ञानू हवालदार यांचे हौतात्म्य कधीच विसरता येणार नाही. यावेळी माजी उपसभापती आनंदराव पाटील म्हणाले, बिळाशीचा इतिहास सर्वांना प्रेरणा देणारा आहे. बिळाशी ग्रुपचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. यानिमित्ताने वारणा प्रसाद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून विजय स्तंभाला मानवंदना दिली. प्रारंभी प्रास्ताविक बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी केले. सूत्रसंचालन समता दूध शहाजी पाटील यांनी तर आभार लता सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमास सुनील पाटील ए.आर.कुलकर्णी, व्हि.बी.पाटील, आनंदा भांदिगरे, उदय बेंद्रे,सुभाष जाधव आदी उपस्थित होते.