तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सावळज परिसरात सिद्धेवाडी तलावातून येणाऱ्या उजव्या व डाव्या कालव्यातुन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मुबलक प्रमाणात पाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी केले. सावळज (ता. तासगांव) येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना खासदार संजय पाटील पुढे म्हणाले, माळ रानावर दगड फोडून जिद्दीने द्राक्ष शेती करणारा या भागातील शेतकरी पाण्याच्या बाबतीत नेहमीच कम नशीबी ठरला आहे. सावळज परिसराचा पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या सिद्धेवाडी तलावातून अंजनी तलावाकडे जाणाऱ्या कॅनॉलची अवस्था अत्यंत दयनीय आहे. संबंधित कॅनॉलचे झालेले काम अत्यंत निकृष्ट असून त्या कॅनल मधून पाणी पुढे जात नाही ही वस्तुस्थिती आहे. यावर पर्याय म्हणून लिंकिंग कॅनॉलच्या बाजूने बंदिस्त पाईपलाईन द्वारे अंजनी तलावात पाणी सोडण्यासाठी आवश्यक असणारा निधी लवकरच उपलब्ध केला जाईल. दरम्यान, सावळजच्या दत्तमाळ ,सोनारकी, जाधव वस्ती परिसरातील उजव्या कॅनॉलचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे. या भागातील शेतकऱ्यांना वारंवार भेडसावणारा पाणी प्रश्न अस्तरीकरणानंतर कायमस्वरूपी मिटून जाईल. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा मोती करण्याची कला या भागातील शेतकऱ्यांना अवगत असून निश्चितच शेतकरी या पाण्याचा चांगला उपयोग करून घेतील. असे मत खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केले. तसेच सावळज येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने एनसीसी विभाग विद्यालयात सुरू करण्याची मागणी खासदार पाटली यांच्याकडे करण्यात आली. याबाबतीतील सकारात्मक प्रतिसाद देत खासदार संजय पाटील यांनी एनसीसी विभाग लवकरच सावळजच्या महात्मा गांधी विद्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असणाऱ्या सावळज येथे प्रशस्त पोलीस ठाणे व्हावे ही मागणी गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. सर्वसामान्य लोकांना पोलीस ठाण्याची दाद मागताना तासगाव पर्यंत जावे लागते. त्यांची होणारी फरपट थांबावी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. याबाबतीत खासदार संजय पाटील यांनी लवकरच सावळज मध्ये पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिले. यावेळी, विकास सोसायटीचे चेअरमन ऋषिकेश बिरने, संदीप माळी, योगेश पाटील,गणेश पाटील, अभिजीत थोरात, विजय पाटील, दिलीप देसाई, विश्वास निकम, सचिन देसाई, सुखदेव पाटील, प्रशांत कुलकर्णी, खंडू ओवाळे, शिवाजी शिंदे, प्रदीप माळी, विनेश पोळ यांसह अनेक जण उपस्थित होते.
