सतेज पाटलांच्या खोटारडेपणाला उच्च न्यायालयाचीही चपराक – अमल महाडिक

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सतेज पाटलांच्या खोटारडेपणाला उच्च न्यायालयाचीही चपराक बसली आहे, अशी टीका माजी आमदार अमल महाडिक यांनी केली. अर्ज छाननी मध्ये कारखान्याच्या पोटनियमांचे पालन न करणारे विरोधी आघाडीचे तब्बल 29 उमेदवार अपात्र ठरले होते. सत्तारूढ गटाने शासकीय यंत्रणेवर दबाव टाकून हे उमेदवारी अर्ज अपात्र ठरवल्याचा आरोप विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी केला होता. या विरोधात त्यांनी प्रादेशिक साखर संचालकांकडे तक्रार केली होती. पण प्रादेशिक साखर संचालकांनीही कारखान्याच्या पोटनियमांचे पालन न करणार्‍या 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले होते. त्यानंतर विरोधकांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी उच्च न्यायालयात विरोधकांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली. बुधवारी दिवसभर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.कोतवालसो यांच्या समोर दोन्ही बाजूनी आपापले म्हणने मांडले. त्यावर सुमारे चार ते पाच तास दोन्ही बाजूंचे पूर्ण म्हणणे ऐकून घेऊन विरोधकांची याचिका फेटाळून लावत त्या 29 जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवले आहेत. महाडिक यांनी सांगितले की, “आम्ही न्यायदेवतेच्या निर्णयाचा सन्मान करतो. सतेज पाटील यांनी आता न्याय देवताही मॅनेज झाली अशी ओरड करू नये. रडीचा डाव..रडीचा डाव म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजून किती दिवस करणार ? त्यांचा अभ्यास कमी पडला हे आता सर्वांना कळून चुकलेलं आहे. खरतर सत्तेचा गैरवापर करून बंटी पाटीलांनी १८९९ खरे सभासद अपात्र केले होते, मात्र आम्ही त्या १८९९ अपात्र सभासदांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन सभासदांचे हक्क अबाधित ठेवले. त्यावेळी आम्ही कधीही त्यांच्यावर टीका केली नाही आणि ते मात्र प्रत्येक वेळी स्वतःची चूक लपवण्यासाठी आमच्यावर टीका करत आहेत. यावरूनच त्यांच्यात किती हिम्मत शिल्लक आहे ते कळते, असेही ते म्हणाले.