सतेज पाटील यांच्या पायाखालची वाळू घसरली – अमल महाडिक

कोल्हापूर, दि.11 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पराभव समोर दिसू लागल्याने सतेज पाटील यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करीत आहेत. असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी लावला. माजी आमदार महादेवराव महाडिक तुमच्या घरात आले, तेव्हा तुम्ही का लपून बसलात असा सवाल करतानाच महाडिक साहेबांचे दार उघडणार्‍या सतेज पाटलांना आम्ही कशाला घाबरायचं ? असे ते म्हणाले. आम्ही अधिकाऱ्यांवर दबाव आणून निर्णय घेतल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ते स्वतः लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना अधिकाऱ्यांना विचारण्याचा हक्क आहे. मग ते अधिकाऱ्यांना न विचारता आमच्यावर कशाला आरोप करतात, त्यांचा जर न्यायव्यवस्थेवर विश्वास असेल तर न्यायालयात जावे आमच्यावर आरोप करू नये. गेले 27 वर्षे आम्ही राजाराम कारखान्यावर सहकार वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सभासदांना चांगला दर आम्ही दिला आहे. यामध्ये राजकारण न आणता आम्ही सभासद हित जपत आहोत. विरोधक मात्र अनेकांना एकत्र करून आमच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारण करत आहेत. त्यांनी कितीही राजकारण केले तरी येत्या वर्षभरात आम्ही कारखान्यात सह वीज प्रकल्प सुरू करून सर्वाधिक दर देऊ अशी त्यांनी सांगितले. डी वाय पाटील कारखान्याबाबत आम्हाला विचारण्याचा निश्चितच हक्क आहे, कारण ते जर राजाराम कारखान्याबाबत विचारत असतील तर डी वाय कारखान्याने काय दर दिला, सभासदत्व कसे रद्द केले ,अहवाल का प्रसिद्ध केला जात नाही, सभा का घेतल्या जात नाहीत याची उत्तरे त्यांनी द्यावी.यावेळी राजाराम कारखान्याचे मा.चेअरमन दिलीप पाटील, भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, दिलीप पाटील, डॉ. मारुती कीडगावकर, दिलीप उलपे, प्रशांत तेलवेकर, किरण जाधव, आनंदा तोडकर, सुरेश पाटील, जयसिंग पाटील, रावसाहेब चौगुले, मारुती वंडकर उपस्थित होते.