सतेज पाटील यांना आमदार केले हि चूक ठरली – महादेवराव महाडिक

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सतेज पाटील यांना आमदार केले ही आयुष्यातील सगळयात मोठी चूक ठरली असा टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोल्हापुरात मारला. दरम्यान, सतेज पाटील हे ९६ कुळी मराठा नव्हे तर हे व्देष-मत्सरांनी पछाडलेला व सूडबुद्धीने वागणारा राजकारणी आहे अशी जोरदार टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली. राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचा प्रचार शुभारंभ आज झाला. वडणगे येथे झालेल्या सभेत महाडिक काका पुतण्यासह माजी आमदार अमल महाडिक यांनीही सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली. सतेज पाटील यांनी लिमिटमध्ये बोलावे, लिमिटमध्ये राहावे’असा इशारा त्यांनी दिला. सदाशिव रघुनाथ पाटील हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी बोलताना माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना डावलून सतेज पाटलांना संधी दिली. पुढे विधानसभेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांना निवडून आणले. सतेज पाटलांना आमदार केली ही आयुष्यातील सगळयात मोठी चूक ठरली. मात्र महाडिक मजबूत आहेत. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात आपण नेहमी सभासद हिताचाच कारभार केला. शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना आहे, मात्र काही जण कारखान्याला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी कितीही त्रास दिला तरी , महाडिक हे लोकांसाठी काम करत राहणार आहे. कारण महाडिकांचं नातं हे लोकांशी जोडले आहे. ते म्हणाले, महाडिक हे शब्द पाळणार आहेत. राजाराम कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देऊ. कारखान्याचे विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प उभारु. शेतकऱ्यांच्या ऊसाला जादा दर देऊ. आमदार सतेज पाटील हे मनोरुग्ण पाटील आहेत. ते सगळीकडे सांगत फिरत असतात, मी ९६ कुळी मराठा आहे. येथे बसलेल्यापैकी निम्मे हे पाटील आडनावाचे आहेत. कोणी सांगतय का, मी ९६ कुळी आहे म्हणून. आपण सगळेच ९६ कुळी आहोत. मात्र सतेज पाटील हे व्देष-मत्सरांनी पछाडलेला व सूडबुद्धीने वागणारा राजकारणी आहे.”अशी जोरदार टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली. महाडिक म्हणाले, आमदार सतेज पाटील यांचा एक टनही ऊसाचा राजाराम कारखान्याला पुरवठा होत नाही. मग त्यांचा निवडणुकीसाठी खटाटोप कशासाठी ? सत्तेचा इतका हव्यास का ? असा सवालही त्यांनी केला. आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक प्रचारात कारखान्याविषयी खोटेनाटे आरोप करुन सभासदांची दिशाभूल करण्याचा खटाटोप करू नये. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविषयी सभ्यतेने बोलावे. आम्ही तुमच्या कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्यावर टीका करायला सुरुवात केली तर ते तुम्हाला सहन होणार नाही. तेव्हा सतेज पाटील यांनी लिमिटमध्ये बोलावे, लिमिटमध्ये राहावे’असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी मारला. यावेळी कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिलीप पाटील, माजी चेअरमन शिवाजी रामा पाटील, दिलीप उलपे, वडणगेच्या सरपंच संगिता शहाजी पाटील, अशोक पवार, पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, मुडशिंगीचे तानाजी पाटील, शिरोलीचे धनाजी पाटील, शेतकरी संघटनेचे सदाशिव कुलकर्णी, डॉ. मारुती किडगावकर उपस्थित होते.