कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सहकार गिळणाऱ्या विरोधकांना राजाराम कारखान्याचे स्वाभिमानी सभासद दारातही उभे करून घेणार नाहीत अशी टीका अमल महाडिक यांनी केली. करवीर तालुक्यातील वसगडे गावात आज राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ आघाडीचे नेते अमल महाडिक यांची प्रचार फेरी झाली. या फेरीमध्ये सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर झालेल्या बैठकीत बोलताना सत्तारूढ आघाडीचे उमेदवार तानाजी पाटील यांनी विरोधकांवर टीका केली. सभासदांना भुलवून तुम्ही गोकुळ नासवलंत पण आता तुम्हाला राजाराम गिळू देणार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर प्रहार केला. प्रत्येक निवडणुकीत दिशाभूल करणारे मुद्दे घेऊन उतरणाऱ्या विरोधकांनी हिंमत असेल तर जाहीर चर्चेला यावं त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आम्ही दिलेली आहेत. फक्त आमच्या सहा प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत असे आव्हान आघाडीचे नेते महाडिक यांनी विरोधकांना दिले. यावेळी रामगोंडा पायगोंडा पाटील, माजी सरपंच नेमगोंडा पाटील अशोक कल्लाप्पा वळीवडे, शशिकिरण हेरवाडे, कुबेर गाठ, युवराज सूर्यवंशी, संजय पाटील, रामगोंडा चौगुले, अण्णा वळिवडे,नेमीनाथ देसाई यांच्यासह राजाराम कारखान्याचे सभासद कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ सहकार आघाडीचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांनी वळीवडे आणि चिंचवाड गावांना भेट दिली. यावेळी सभासदांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी बोलताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले,जुन्या जाणत्या सभासदारांनी नेहमीच सहकाराला कौल दिला आहे. याही निवडणुकीत तुमचे आशीर्वाद सत्तारूढ सहकार आघाडीच्या पाठीशी राहू द्या. तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही याची खात्री आहे असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना माजी सरपंच अनिल पंढरे यांनी राजाराम कारखान्याने नेहमीच सभासदाभिमुख कारभार केला आहे. आज जे लोक विरोधकांच्या सोबत फिरत आहेत त्यांचेही मयत शेअर्स ट्रान्सफर करण्यात आले आहेत. चिंचवाड गावातील सभासदांची बोलताना महाडिक म्हणाले, ज्यांनी स्वतःच्या कारखान्यात सहकाराचा बळी घेतला ते सहकार वाचवायच्या वल्गना करत आहेत.
