सांगलीच्या सह्याद्री कदमची महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात निवड

1 ऑक्टॉबर पासून नागपुरात होणार टी -20 क्रिकेट सामने

सांगली, दि. 27 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) 1 ऑक्टॉबर 2024 पासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या डोमेस्टिक टी – 20 या नॅशनल क्रिकेट सामन्यासाठी बांबवडे ता. पलुस येथील सह्याद्री कदम हिची 19 वर्षाखालील महिलांच्या महाराष्ट्र संघात निवड झाली. सह्याद्रीने नुकत्याच सांगली येथे झालेल्या एक दिवसीय अंतर जिल्हा इन्व्हिटेशन सामन्यांमध्ये मध्ये सांगली संघातून लातूर विरुद्ध 220 धावा, धुळे विरुद्ध नाबाद 115 तसेच नाशिक विरुद्ध सामन्यात 61 धावा काढून दमदार कामगिरी केली. तिने निमंत्रीत सामन्यात महाराष्ट्रात सर्वाधिक धावा काढून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. केरळ येथे झालेल्या अंतर राज्य सामन्यात तिने केरळ, बंगाल आणि छत्तीसगड संघांच्या विरोधात उत्तम कामगिरी केली आणि याच कामगिरीची दखल घेत तिची महाराष्ट्र संघात निवड कारण्यात आली. सह्याद्री कदम ही वयाच्या 7 व्या वर्षापासून तासगाव ते सांगली असा रोजचा प्रवास करून सराव करत होती. तिच्या व तिच्या आई-वडिलांच्या कष्टांना यश आले आहे. तिचे वडील अभिजित कदम हे बांबवडे गावचे माजी उपसरपंच असून सध्या ते तासगाव येथे शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत, तर आई माया कदम ह्याचं तासगाव येथे कपड्याचे दुकान आहे. तर तासगाव चे माजी नगराध्यक्ष दिनकर दादा धाबूगडे यांची ती नात आहे. यापूर्वी 15 वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात देखील ती सलग दोन वर्ष खेळली आहे. सांगली येथे भारतीय संघातील खेळाडू स्मृती मानधना यांचे वडील श्रीनिवास मानधना यांनी सुरू केलेल्या एस एम 18 या अकॅडमीत तिला प्रशिक्षणाचे धडे मिळाले. यासाठी तीला मार्गदर्शक म्हणून स्मृती मानधना, श्रीनिवास मानधना तर प्रशिक्षक म्हणून अक्षय पाटील, अनंत तांबवेकर यांचं मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज, सांगली क्रिकेट असोसिएशन चे राहुल आरवाडे याचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या निवडीनंतर बांबवडे, तासगाव व सांगलीत येथील क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. सह्याद्री च्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.