सांगलीतील साजरा झाला द्राक्ष दिन

चक्क द्राक्षाचा केक कापून साजरा केला वाढदिवस

सांगली, दि.18 फेब्रुवारी 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)

महाशिवरात्री सणाचे औचित्य साधून आज सांगलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय स्थापन महाविद्यालयात द्राक्ष फळापासून तयार केलेला केक कापून द्राक्ष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या डिप्लोमा इन एग्रीकल्चर एक्सटेन्शन सर्विस फोर इनपुट डीलर्स (DAESI) कोर्सचे समन्वयक नरसिंह चव्हाण, द्राक्षभूमी ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापक अभिजीत झांबरे, कृषी व्यवसायिक प्रल्हाद देसाई, सुरेश कोरे प्रगत शेतकरी शरद पाटील मधुकर पिंजारी, अश्विनी महाडिक आदींसह कृषी व्यवसायिक तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

यावेळी द्राक्ष दिनाविषयी बोलताना द्राक्षभूमी शेतकरी संस्थेचे अध्यक्ष अभिजित झांबरे म्हणाले महाशिवरात्रीचा दिवस आपल्या सर्वांच्याच दृष्टीने श्रध्देचा आणि आस्थेचा दिवस आहे. या महाशिवरात्रीच्या उपवासाला लोक अधिकत्तर फळांचे अन्नग्रहण करत असतात. या काळा दरम्यान बाजारपेठेत देखील विविध फळांना मोठी मागणी असते. योगा-योगाने आपल्या द्राक्षफळ काढणीचा हंगाम देखील या सणा दरम्यान येत असल्याने या काळात द्राक्षांना मोठी मागणी असते. या गोष्टीचा विचार करून या काळात बाजारपेठेतील ग्राहकांचे लक्ष आपल्या द्राक्ष फळाकडे वेधले जावे, द्राक्ष फळाची आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा व्हावी. या हेतूने महाशिवरात्रीचा दिवस द्राक्ष दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जावा, जेणे करून द्राक्ष फळाची बाजारपेठेतील मागणी वाढून द्राक्षमालाचा चांगला उठाव होईल तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्ष मालाला देखील चांगला भाव मिळू शकेल.

दरवर्षी आपण महाशिवरात्रीचा दिवस हा द्राक्ष दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करायला हवा,तसेच विविध नाविन्यपूर्ण कल्पना राबवून मार्केटमधील ग्राहकांच्या मनात द्राक्ष फळाचे महत्त्व ठसवले पाहिजे. त्यासाठी विविध संस्था, कृषी कंपन्या तसेच सर्व शेतकरी पुत्रांनी महाशिवरात्रीचा दिवस हा द्राक्ष दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी द्राक्ष दिनाची मोहीम पुढील काळात व्यापक प्रमाणात राबवली जावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या डिप्लोमा इन एग्रीकल्चर एक्सटेन्शन सर्विस फोर इनपुट डीलर्स (DAESI) कोर्सचे समन्वयक श्री नरसिंह चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.