स्वर सम्राज्ञी – लता दीदी

संकलन : शरद मगदूम – अबकड कल्चरल ग्रुप, सांगली

महाराष्ट्र मराठी न्यूज दि. ६ फेब्रुवारी (सांगली)


आज ६ फेब्रुवारी स्वर सम्राज्ञी भारतरत्न – लता मंगेशकर यांचा प्रथम स्मृतिदिन लता मंगेशकर यांची गाणी म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती. लता मंगेशकर, भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथील मराठी भाषिक गोमंतक कुटुंबात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते, त्यामुळे लताजींना संगीताचा वारसा लहानपणापासूनच मिळाला. त्यांना लहानपणी “हेमा” या नावाने हाक मारली जायची, पण दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.
लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी गायनात पाऊल ठेवले होते आणि १९४२ मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. आपल्या वडिलांच्या मराठी संगीत नाटकात त्यांनी पाचव्या वर्षी काम सुरू केले. वयाच्या १३ व्या त्यांनी किती हासाल या चित्रपटात नाचू या गडे खेळु सारी मनी हौस भारी हे गाणे म्हटले. मात्र त्याचा समावेश झाला नाही. १९४२ मध्ये पाहिती मंगळागौर या सिनेमात त्यांनी छोटीशी भूमिकाही केली आणि नटली चैत्राची नवलाई हे गाणेही गायले.

गजाभाऊ या मराठी चित्रपटात माता एक सुपुत की दुनिया बदल दे तू हे पहिले हिंदी गीत गायले. लता दीदी १९४३ मध्ये मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास भिंड बझार घराण्याचे उस्ताद अमन अली खान यांच्याकडे सुरवात केली. वसंत जोगळेकर यांच्या आपकी सेवा मे (१९४६) पा लागून कर जोरी हे गीत त्यांनी गायले. त्याला दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते.१९४५ बडी माँ या चित्रपटात त्यांनी माता तेरे चारणोमे हरभजन म्हटले. लता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो आयेगा आने वाला या गाण्यासाठी हे गाण इतकं प्रसिद्ध झालं की त्यांच्याकडे गाण्यासाठी रांग लागली.आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती व २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं होते. ‘एक प्यार का नगमा है’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘एक राधा एक मीरा’ आणि ‘दीदी तेरा देवर दीवाना’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमागे लता मंगेशकर यांनी आवाज दिला.

लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण, १९९९ मध्ये द्वितीय-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. २००१ मध्ये त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत रत्न या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले एम एस सुब्बलक्ष्मी यांच्यांनंतर हा पुरस्कार पटकावणाऱ्या दुसऱ्या गायिका होत्या. त्यांना २००९ मध्ये ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बंगाल चित्रपट पत्रकार पुरस्कार १५ वेळा तर फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार चार वेळा पटकावला. त्यांना फिल्मफेअर कडून दोनदा विशेष सन्मान करण्यात आला होता.

१९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानंही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली जी अविरत सुरू आहे. तसेच त्यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. आकाशात देव आहे का असं कुणी विचारलं तर देवाचं माहित नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे!. दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या महतीचं वर्णन केलं होतं.

गेल्या वर्षी लता मंगेशकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून मुंबईतील प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे कला अकादमीमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’चे उद्घाटन करण्यात आले. लता मंगेशकर यांचे निधन ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले. लता मंगेशकर यांना भावपूर्ण आदरांजली.

संकलन : शरद मगदूम
अबकड कल्चरल ग्रुप
सांगली 🪀 9422622626