पॉलिश करायला आले आणि दागिने लंपास केले

कवठेएकंद येथे वृद्ध दांपत्याला साडेचार लाखाचा गंडा

साडे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण हातोहाथ लंपास, दोन अज्ञात चोरट्याचे कृत्य, सिसिटीव्ही कॅमेरात संपूर्ण प्रसंग कैद

तासगाव, (बुधवार दिनांक – 30 जुलै 2025, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे नांद्रे रोड वरील पाण्याच्या टाकी जवळ तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्या ‘नारायण’ या निवास्थानी राहत असलेले त्यांचे वडील बाबुराव माळी व आई ताराबाई माळी यांना बुधवारी सकाळी साडे दहा च्या सुमारास दोन अज्ञात चोरटयानी तांबे, पितळ भांडी व सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अज्ञात दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तासगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कवठेएकंद येथील नांद्रे रोड वरील पाण्याची टाकीजवळ पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी यांचे ‘नारायण’ या नावाचे निवासस्थान आहे. या राहत्या घरी त्यांची आई व वडील हे दोघेच वृद्ध दांपत्य राहत आहेत. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घरी दोन अज्ञात 25 ते 30 या वयोगटातील इनशर्ट केलेले युवक तांबे पितळ भांडी व इतर धातूची वस्तू पॉलिश करण्याच्या बहाण्याने आले. सुरुवातीला या भामट्यानी घराच्या व्हऱ्यांड्यात कट्ट्यावरती तांब्या व पितळेची भांडी स्वच्छ पॉलीस करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोन्याची दागिने पॉलिश करण्याच्या निमित्ताने दागिन्याची मागणी केली. यावेळी ताराबाई माळी यांनी त्यांचे साडेचार तोळ्याचे गंठण भामट्यांच्या हातात दिले. त्यांनी पॉलिश करण्याच्या बहाण्याने एका कपड्यात दागिने गुंडाळे. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हळद टाकून दागिने त्यात टाकल्याचा बहाना केला. हे भांडे गॅस वरती पंधरा मिनिटे तापत ठेवण्यास सांगितले. एका भामट्याने स्वतः हे भांडे घरामध्ये आत मध्ये जाऊन गॅस वरती ठेवल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यानंतर किमान 15 मिनिटानंतर ते भांडे खाली उतरून घ्या असे सांगून दोघे भामटे तेथून पसार झाले. त्यांची ही चलाकी बाबुराव माळी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीस गॅस वरती तापत ठेवलेल्या भांड्यात दागिने असल्याची खात्री करण्यास सांगितले. ताराबाई माळी यांनी तात्काळ घरामध्ये जाऊन खात्री केली असता, गॅसवरील भांड्यात दागिने नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी धावाधाव केली तोपर्यंत भामटे तिथून पसार झाले होते. याचे वृत्त तासगाव पोलीस ठाण्यात समजतात घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी धाव घेतली. सांगलीहून स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण विभाग, ठसे तज्ञ यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबत ताराबाई बाबुराव माळी यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.