काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांचा आरोप: पैसे घरात पोहोचल्यानंतर नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
तासगाव, गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी माझ्या पत्नीला देण्याचा शब्द माजी खासदार संजय पाटील यांनी दिला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी ५ कोटी रुपयांना विकली. लँडमाफिया असणाऱ्या बाबासाहेब पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. ५ कोटी चिंचणी येथील घरात पोहोचल्यानंतरच ही उमेदवारी जाहीर करण्यात आली, अशी जहरी टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी माजी नगराध्यक्ष अजय पवार उपस्थित होते. ते म्हणाले, गेली २२ वर्षे मी आणि संजय पाटील विरोधात होतो. त्यांच्याशी कधीही मी युती केली नाही. पण बाजार समितीच्या निवडणुकीवेळी आम्ही नाईलाजाने एकत्रित आलो. माजी पंचायत समिती सदस्य सुनिल जाधव यांनी आमच्यात मध्यस्थी केली होती. त्यानंतर लोकसभा व विधानसभेला तालुक्यातील उमेदवार म्हणून आम्ही संजय पाटील यांचे काम केले. नंतरच्या काळात संजय पाटील, सुनिल जाधव, माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील व माझी नगरपालिका निवडणुकीच्या दृष्ठीने चर्चा झाली होती. त्यावेळी सर्वांनी माझ्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर गेल्या वर्षभरात आम्ही एकत्रित पालिका निवडणुकीच्या दृष्ठीने काम करीत होतो. प्रत्येक प्रभागात उमेदवार ठरवण्यात येत होते. समविचारी लोकांना एकत्रित घेऊन पॅनेल करायचे, असे ठरल्याने मी काँग्रेसेच स्वतंत्र पॅनेल लावले नाही. दरम्यान, संजय पाटील यांनी माझ्याच पत्नीला नगराध्यक्षपदाची उमदेवारी देण्यासंदर्भात १०० वेळा शब्द दिला होता. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते या शब्दावर ठाम होते. मात्र त्यांनी मला निवडणुकीत पैसे किती खर्च करणार, असे विचारले होते. त्यावेळी मी निवडणुकीसाठी लागणारा खर्च मी करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. आमचे नेते विश्वजित कदम मला आर्थिक मदत करणार होते. मात्र ऐनवेळी संजय पाटील यांनी माझी उमेदवारी डावलून तासगावात लँडमाफिया यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. त्यासाठी ५ कोटी रुपयांचा सौदा ठरला. हे पैसे संजय पाटील यांच्या घरी पोहोचल्यानंतरच त्यांनी उमेदवारी जाहीर केली, असा आरोप महादेव पाटील यांनी यावेळी केला. संजय पाटील काळ्याकुट्ट मनाचे, यापुढे त्यांच्यासोबत काम करणार नाही. माजी खासदार संजय पाटील हे काळ्याकुट्ट मनाचे आहेत. त्यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत मला गाफील ठेवले. मला अंधारात ठेवले. त्यामुळे यापढील काळात संजय पाटील यांच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. त्यांच्यासोबत यापुढे काम करणार नाही, असे महादेव पाटील म्हणाले.
