तासगावात भाजपा कडून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

संदीप गिड्डे यांचा घणाघात : राष्ट्रवादीच्या ज्योती पाटील यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

तासगाव, शुक्रवार दिनांक – 28 नोव्हेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत महायुती करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र त्यांचे निर्देश फाट्यावर मारुन भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे स्वतंत्र पॅनेल लावले. हे पॅनेल लावताना अनेक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, असा घणाघाती आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्ढे यांनी पत्रकार परिषदेत केला. तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्योती पाटील यांना मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले, नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंघाने माझ्या भूमिकेबाबत तर्क – वितर्क लढवले जात आहेत. मी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र मी भाजपचा समर्पित कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश माझ्यासाठी अंमित आहे. सुरुवातीच्या काळात तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत मी होतो. मात्र नंतरच्या काळात मला तासगावच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले नाही. पण, मी इथली सगळी परिस्थिती भाजपच्या शिर्ष नेतत्वाकडे मांडली होती. त्यावेळी आपण तासगावात राष्ट्रवादीसोबत युती करावी. इथल्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योती पाटील या बलवान आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले होते. त्यावेळी त्यांनी ज्योती पाटील यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला होता. शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत महायुती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले होते. ही महायुती व्हावी, यासाठी मी प्रयत्न केले. मात्र इथल्या स्थानिक पदाधिऱ्यांना आपण फार मोठे झाल्यासारखे वाटत होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देश फाट्यावर मारले व जिल्ह्यातील भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून भाजपचे पॅनेल लावले. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनसंपर्क कार्यालयांच्या उद्घाटनावेळी शहर व ग्रामीणमध्ये समन्वय ठेवा. तो असेल तरच मी तुम्हाला ताकद देईल. पालिक निवडणुकीत मी स्वतः प्रचाराला येईन, असे सांगितले होते. मात्र तासगावात शहर आणि ग्रामिणमध्ये समन्वय राहिला नाही. निवडणूक, प्रचाराच्या अनुषंघाने वरिष्ठांकडून आलेल्या सूचना माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात नाहीत. मला अंधारात ठेवले जाते. गिड्डे – पाटील म्हणाले, जर माझ्यावर कुरघोड्या करुन कोणी माझ्या राजकीय अस्तित्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर मी स्वस्थ बसणार नाही. मी आजपर्यंत उपयुक्त मूल्य दाखवले. पण आता उपद्रव मूल्य दाखवण्याची वेळ आली आहे. तासगावच्या निवडणुकीत मी कोणत्याही पक्षाविरोधात भूमिका मांडणार नाही. मला माझ्या पक्षाकडून कोणताही आदेश आला नाही. पण, माझ्या नेतृत्वावर ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्या उमेदवारांना मी विविध पक्षातून संधी दिली आहे. त्यांना निवडून आणणे, ही माझी जबाबदारी आणि प्राथमिकता आहे. ते म्हणाले, भाजप हा सामुहिक निर्णय घेणारा पक्ष आहे. पण, तासगावात तसं होत नाही. इथले पदाधिकारी स्वतःचीच सर्कस उभी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या डोक्यात कोणी काय भरवलं आहे, माहित नाही. यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तासगाव नगरपालिका निवडणुकीत माझी अवस्था कुरुक्षेत्रातील अर्जुनासारखी झाली आहे. मला विश्वासात घेतले जात नसल्याने मी माझ्या शिलेदारांना विविध पक्षातून उभे केले आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी मी जीवाचे रान करणार आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योती पाटील यांच्या प्रचारात मी सक्रीय सहभागी होणार आहे, असे संदीप गिड्डे म्हणाले.