तासगाव, शनिवार दिनांक – 20 डिसेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, कोणाकडूनही गोंधळ घालण्याचा किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिला आहे.या बंदोबस्तात १ उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी), १० पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक (पीआय/एपीआय), १०४ पोलीस कर्मचारी व ५० होमगार्ड यांचा समावेश आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात सतत पेट्रोलिंग व रूट मार्च सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे म्हणाले की, मतमोजणी दरम्यान व निकालानंतर मिरवणूक, डीजे व फटाके यांना कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी तसेच जय व पराजय संयमाने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.नगरपालिका मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
