योगेवाडीच्या लोकनियुक्त सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल

उपसरपंचासह सात सदस्यांनी तहसीलदारांच्याकडे सादर केला प्रस्ताव.

तासगाव, मंगळवार दिनांक – 6 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील योगेवाडी‌ येथील लोकनियुक्त सरपंच दिपाली राजेश माने यांच्या विरोधात सात सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. अविश्वासाचा प्रस्ताव तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याकडे सादर केला आहे. योगेवाडी ग्रामपंचायत ची निवडणूक 2022 मध्ये झाली होती यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये दिपाली माने या आमदार रोहित पाटील गटातून थेट सरपंच पदासाठी निवडून आल्या होत्या. तर उर्वरित सात सदस्यांमध्ये आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील गटातील सात सदस्य निवडून आले होते. पण गेल्या काही काळामध्ये सरपंच दिपाली माने यांचे पती कारभारामध्ये लक्ष घालत होते, त्यांचा हस्तक्षेप पाडला होता. कारभारामध्ये सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे, गावातील घरासमोर स्वतःच्या अतिक्रमण असणे, गावाच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करणे, सरपंचांच्या कारभाराच्या विरोधात संपूर्ण ग्रामस्थांमध्ये नाराज असणे या कारणावरून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव असा दाखल केला आहे. ठरावावरती उपसरपंच विनोद माने, ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत माने, सुहास माने, सीमा साळुंखे, सुनिता माने,शोभा चौगुले व विद्या पवार यांच्या सह्या आहेत. यासंदर्भात तहसीलदार ठराव मंजूर करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.