तासगावच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पोलीस दलात एकच खळबळ, कारण अस्पष्ट

तासगाव, बुधवार दिनांक – 7 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेस असलेल्या सुरज मराठे या पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सकाळी पुणे येथील एका लॉजवर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेने पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलात अधिकारी म्हणून घडण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका तरुण अधिकाऱ्याने आपले आयुष्य असे अकाली संपवल्याच्या या हृदयद्रावक घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. सूरज मराठे हे मूळचे आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील रहिवाशी असून ते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून तासगाव येथे गेल्या सहा महिन्यापासून पाहिले पोस्टिंग असल्यामुळे पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, कर्तव्यनिष्ठ, शांत आणि अभ्यासू असल्यामुळे पोलीस ठाण्यात आणि लोकांच्यात अतिशय कमी कालावधीत ते लोकप्रिय झाले होते. सुरज मराठे हे अविवाहित होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते रजेवर होते. बुधवारी सकाळी त्यांनी अचानक विष प्राशन करून आयुष्याला पूर्णविराम दिला. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. ही बातमी समजताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एका होतकरू अधिकाऱ्याचे असे अकाली जाणे, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी अंतर्मुख करणारी घटना असल्याची भावना व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.