वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात पोलीस स्थापना दिन साजरा

तासगाव, गुरुवार दिनांक – 8 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) महाविद्यालयातील शिस्त व स्पर्धा परीक्षा समिती, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक (पी. आय.) हिम्मत माने पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक (ए.पी.आय.) सचिन पवार हे त्यांची टीम पोलिस हवालदार मोहन माळी आणि पोलिस शिपाई सुनिल दराडे यांच्यासोबत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस दलाची संरचना , गुन्हे नियंत्रण आणि गुन्हे तपास यातील भूमिका, समाजातील सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस प्रशासन करत असलेले कार्य, महिला – बाल कायद्याच्या तरतुदी, सायबर गुन्हे आणि वाहन अपघात रोखण्यासाठीच्या विद्यार्थी आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या अशा विषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पी. आय. हिम्मत माने पाटील, एपीआय सचिन पवार आणि टीम यांनी पोलीस वापरत असलेल्या विविध शस्त्रांची माहिती देत त्यांच्या कार्यपद्धती, सुरक्षित वापर व शिस्तीचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शस्त्रांची रचना, उपयोग व काळजी याबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी, “पोलीस दल हे समाजातील शिस्त, कायदा व सुरक्षिततेचा कणा असून विद्यार्थ्यांनी नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखली पाहिजे,” असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलाबद्दल आदर, विश्वास व देशसेवेची भावना निर्माण झाली. कार्यक्रमाची प्रास्ताविक कॅप्टन डॉ.विनोदकुमार कुंभार यांनी केले. तर आभार ज्युनिअर प्रमुख एस.आर.पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमास डॉ.शहाजी पाटील, डॉ.अमित माळी, डॉ. विशाल पाटील, डॉ. दत्ता गुंजाळ, प्रा.शंकर माळी, प्रा. बी.एल.माने यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग,एन.सी.सी. छात्र, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.