प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदे एका झटक्यात रद्द – जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची पत्रकार परिषदेत घोषणा, तासगाव नगरपरिषद निवडणुकीत पक्ष विरोधी भूमिका घेतल्याचा ठपका.
तासगाव, शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्ष धोरणाच्या विरोधात भूमिका घेवून पक्षाची शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवून किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे-पाटील यांची भाजपा मधून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाडिक यांचा हा निर्णय भारतीय जनता पक्षात खळबळ उडवणारा आहे. पक्षशिस्तीचा भंग, धोरणविरोधी भूमिका आणि उघड पक्षविरोधी हालचाली केल्याच्या ठपक्यावर संदीप गिड्डे-पाटील यांची भाजपमधून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याचा अधिकृत आदेश काढला असून, त्यानुसार त्यांची प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदे तत्काळ रद्द करण्यात आली आहेत.१० जानेवारी २०२६ पासून हा निर्णय अमलात आला असून, यापुढे गिड्डे-पाटील हे भाजपचे सदस्य मानले जाणार नाहीत. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेनुसार व जिल्हा पातळीवरील एकमताने ही कठोर कारवाई करण्यात आल्याने भाजपमध्ये शिस्त सर्वोच्च असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.गटबाजी, बंडखोरी आणि पक्षाच्या धोरणाविरोधात जाणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा थेट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. दरम्यान या संदर्भात संदीप गिड्डे यांनी मी सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानुसार भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहे. जिल्हा अध्यक्षाच्या पत्राबाबत मी प्रदेशाध्यक्षांशी बोललो असता त्यांनी आपण पक्षाच्या कामात व प्रचारात रहा असा आदेश दिला असून जिल्हाध्यक्षांच्या पत्रा बाबत १५ तारखेनंतर भूमिका घेऊ असे स्पष्टीकरण दिले आहे.
झारीतील शुक्राचार्यांना संपवणार – संदीप गिड्डे पाटील, (प्रदेश सरचिटणीस – भाजपा किसान मोर्चा) – सध्या राज्यभरात महानगरपालिका निवडणूक सुरू आहेत. माझे मित्र व पक्षाचे माध्यम प्रमुख श्री नवनाथ बन हे मानखुर्द शिवाजीनगर या प्रभागातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत. माझ्या कवठेमंकाळ तालुक्यातील अनेक मतदार या प्रभागांमध्ये आहेत. त्यामुळे पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानुसार मी सध्या श्री नवनाथ बन यांच्या प्रचारामध्ये आहे. जिल्हाध्यक्षांनी निर्गमित केलेल्या पत्राबाबत मी प्रदेशाध्यक्षांशी बोललो असता त्यांनी आपण पक्षाच्या कामात व प्रचारात रहा असा आदेश दिला असून जिल्हाध्यक्षांच्या पत्रा बाबत १५ तारखेनंतर भूमिका घेऊ असे स्पष्टीकरण दिले आहे.तासगाव नगरपालिकेत घेतलेली भूमिका ही माझी जाहीर भूमिका होती. मी आजही त्याच भूमिकेबरोबर ठाम आहे. तासगाव नगरपालिकेमध्ये नेमकं काय काय झाले याबाबत सविस्तर अहवाल मी या अगोदरच प्रदेशाध्यक्षांना दिला आहे. जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी घेतलेली भूमिका मला त्यांची वैयक्तिक वाटत नसून या भूमिकेत जिल्ह्यातील एक दोन नेत्यांचा विशेष रस असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्याध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेबाबत माझी सध्या कोणावरही नाराजी नाही.पण झारीतील शुक्राचार्य मी संपविल्याशिवाय शांत बसणार नाही.

