शैक्षणिक गुणवत्तेसोबत व्यवहारज्ञानाची शिदोरी हवीच – नगराध्यक्षा विजया पाटील

तासगावात चिमुकल्यांनी उभारले खाऊ विक्रीचे स्टोल; संत नामदेव प्राथमिक विद्यामंदिरचा नावीन्यपूर्ण उपक्रम

तासगाव, शनिवार दिनांक – 17 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, क्रीडा आणि व्यवहारज्ञान अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन तासगावच्या नगराध्यक्षा विजया पाटील यांनी केले.तासगाव शहरातील पेटकर प्लॉट येथील नगरपरिषदेच्या संत नामदेव प्राथमिक विद्यामंदिर शाळा क्रमांक २ मध्ये मकर संक्रांत निमित्त महिलांचा हळदीकुंकू व चिमुकल्यांचा खाऊ विक्रीच्या स्टोलचे आयोजन करण्यात आला होते. या कार्यक्रमावेळी त्याप्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.यावेळी नगराध्यक्षा विजया पाटील यांच्यासह नगरसेवक मधुकर पाटील, नगरसेविका जयश्री कोकळे व रोहिणी धोत्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी उभारलेल्या खाऊच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. चिमुकल्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या पदार्थांच्या विक्रीतून व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.नगराध्यक्षा विजया पाटील यांनी तासगाव शहरातील सर्व प्राथमिक शाळांची गुणवत्ता कायम राखण्यावर भर देत विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुविधा व शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी म्हणून कोणतीही कसर ठेवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विषयतज्ज्ञ स्वाती पाटील यांनी प्राथमिक शिक्षणासोबतच शिष्यवृत्ती, नवोदय व इतर स्पर्धा परीक्षांबाबत पालकांनी जागरूक राहावे, असे आवाहन केले. भविष्यातील तीव्र स्पर्धेत टिकण्यासाठी ही तयारी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यामंदिर परिसर आकर्षक रांगोळी व सजावटीने नटला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या खाऊच्या स्टॉलला पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका सुवर्णा जाधव, लता माळी, स्मिता लठ्ठे, अंगणवाडी सेविका कांचन माळी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कोमल देशमुख तसेच सर्व शिक्षक-शिक्षिकांनी केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अभ्यासाची सवय लागवण्यासाठी ‘अभ्यासाचा भोंगा’ – विजया पाटील —- विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला मोबाईल व टीव्हीचा अतिरेक टाळण्यासाठी तसेच अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी तासगाव नगरपरिषदेच्या वतीने युवानेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘अभ्यासाचा भोंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भविष्यातील धोके टाळण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थी व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा विजया पाटील यांनी केले.