सव्वा तीन कोटींचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची मोठी कारवाई
सांगली, बुधवार – दिनांक 20 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – जिल्हा मध्यवर्ती बँक झरे येथील लॉकर गॅस कटरने फोडून करण्यात आलेल्या मोठ्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात सुमारे ३ कोटी २५ लाख ४८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उत्तर प्रदेश व सांगली जिल्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली चे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व जयदीप कटकरे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई केली. या मध्ये अटक केलेली चार आरोपी राहुल रंजीत शर्मा (27) – ज्वेलरी व्यवसाय, रा. गाव ककराळा, ता. व जि. बाघपत, उत्तर प्रदेश, विश्वजीत विजय पाटील (28) – गल्लाई कामगार, रा. बाबवडे, ता. पलूस, जि. सांगली, संकेत अरुण जाधव (26) – कपड्याचे दुकान व्यवसाय, रा. बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली व इशान राजू आसार (30) – पानपट्टी दुकानदार, रा. आमनापुर, ता. पलूस, जि. सांगली. तपासादरम्यान या आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड रक्कम, स्कॉर्पिओ चारचाकी वाहन, गॅस सिलिंडर तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी उत्तर प्रदेशातून येऊन हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाई मध्ये सागर लवटे, संदीप तलवडे, सागर टिंगरे, रणजित जाधव, अभिषेक फकीर, नरोश खवात, अनिल कोंडकर, अतुल माने, सोमनाथ गुंडे, सतीश माने, मयंक वडे, दरिबा बंडगर, संदीप गुरव, उदय माळी, अमर नरळे, महादेव नागणे, अरुण पाटील, अमोल कदम, अमोल लोहार, प्रमोद सासवे, सुनील जाधव, सुरज थोरात, केशव चव्हाण, विक्रम शेट, रोहन घरडे, अभिजीत घाणेकर, शिवाजी सिद, अभिजीत पाटील, अजय पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.







