साहित्य साधना पुरस्कार डॉ. प्रतिभा पैलवान यांना प्रदान….

खेड, दि.21 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पसायदान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी दिला जाणारा यंदाचा साहित्य साधना पुरस्कार 2023 इचलकरंजी येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील डॉ. प्रतिभा पैलवान यांना प्रदान करण्यात आला. भामचंद्र नगर, ता.खेड,जि.पुणे येथे आयोजित सोहळ्यात युवा कीर्तनकार ह.भ.प.श्री चैतन्य महाराज वाडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, येरवडा तुरुंग प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चंद्रमणी इंदुरकर उपस्थित होते. डॉ. पैलवान यांनी केलेल्या सामाजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी डॉ. पैलवान यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांनी आजपर्यंत चार कवितासंग्रहाचे प्रकाशन केले असून आणखीही नवीन प्रोजेक्ट वरती त्यांचे काम सुरू आहे. तसेच त्यांनी तृतीयपंथीयांसाठी केलेल्या कार्याची दखल समाजातील सर्व स्तरावरती घेतली जात आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे. समाजामध्ये समाजासाठी लढण्यासाठी समाजाचा पाठिंबा असणं गरजेचं असतं आणि तो डॉ. पैलवान यांना मिळत आहे, हीच त्यांच्या कार्याची पोच पावती आहे. मानाचे शिल्ड, प्रमाणपत्र ,शाल ,श्रीफळ आणि रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.