वारणावतीत पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

शिराळा, दि. २७ फेब्रुवारी २०२३ (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) वारणावती (ता.शिराळा) येथील भर नागरी वस्तीत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळ ही घटना घडली. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. वारणावती येथे आमीन गुड्डापुरे यांनी आपल्या राहत्या घरी कुत्रे पाळले आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास यांच्या घराजवळ असणाऱ्या रस्त्यावर बिबट्या सुमारे अर्धा तास बसून होता. त्यानंतर जवळच असणाऱ्या त्यांच्या पाळीव कुत्र्यावर त्याने झडप घालून त्याला भक्ष्य केले. झटापट ऐकू आल्यामुळे गुड्डापूरे व त्यांच्या घरातील सर्वजण बाहेर आले तो पर्यंत बिबट्याने अलगद कुत्र्याला घेऊन पलायन केले होते. हा सर्व थरार त्यांनी घरासमोर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वारणावती वसाहतीला लागूनच जवळपास चांदोली अभयारण्य आहे. त्यामुळे अनेक प्राणी या परिसरात भटकंती करत आहेत. यापूर्वी अनेक गवे वस्तीत नागरिकांनी पाहिले आहेत. वसाहतीमध्ये असणारे अनेक मोकाट कुत्रेही गायब झाली आहेत त्यामुळे बिबट्याचाही वसाहतीत वावर आहे. अशी बऱ्याच दिवसापासून चर्चा होती.काल मात्र गुड्डापुरे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्यामुळे त्याचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकात भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.